रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून पॉलिटिकल क्रिकेट लीग; तटकरे आणि गोगावलेंमध्ये शाब्दिक टोलेबाजी

विधानसभा निवडणुकीचा वर्ल्डकप महायुतीनं जिंकलाय. महायुती महाराष्ट्रात सिकंदर ठरली असली तरी महायुतीतच आता रायगड पॉलिटिकल प्रिमिअर लिग सुरु झालीये. हा सामना आहे पालकमंत्रिपदासाठीचा.

पुजा पवार | Updated: Feb 17, 2025, 09:00 PM IST
रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून पॉलिटिकल क्रिकेट लीग; तटकरे आणि गोगावलेंमध्ये शाब्दिक टोलेबाजी
(Photo Credit : Social Media)

प्रफुल्ल पवार आणि कपील राऊत (प्रतिनिधी) रायगड / मुंबई : रायगड जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरून पॉलिटिकल प्रिमिअर लीग रंगल्याचं पाहायला मिळालं. पालकमंत्रिपदावरून सुनिल तटकरेंनी चांगलीच फटकेबाजी केलीय. पंचाचा निर्णय अंतिम असतो आणि तो मान्य करावा लागतो असं सांगत तटकरेंनी गोगावलेंना टोला लगावलाय. आणि त्याला गोगावलेंही त्याच भाषेत उत्तर दिलंय. 

विधानसभा निवडणुकीचा वर्ल्डकप महायुतीनं जिंकलाय. महायुती महाराष्ट्रात सिकंदर ठरली असली तरी महायुतीतच आता रायगड पॉलिटिकल प्रिमिअर लिग सुरु झालीये. हा सामना आहे पालकमंत्रिपदासाठीचा.. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा चषक कोण जिंकणार यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जबरदस्त चुरस सुरु आहे. मागे एकदा महायुतीचे महागुरु फडणवीसांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा चषक आदिती तटकरेंकडे सोपवला. पण तो निकाल शिवसेनेला मान्य नव्हता. शेवटी सामना परत टाय झाला. पालकमंत्रिपदाचा चषक पुन्हा राखीव ठेवला गेला. आता शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी पुढच्या दोन दिवसांत पालकमंत्रिपदाचा निर्णय फायनल होणार असं सांगायला सुरुवात केली. दोन दिवस गेले दोन आठवडे गेले तरीही पालकमंत्रिपदाचा फैसला झाला नाही. शेवटी गोगावलेंनी पालकमंत्रिपदासाठी तुळजाभवानीला कौल लावला.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगत असताना सुनील तटकरेंनी क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी केलीय एकामागून एक सुरेख फटके सुनील तटकरेंनी क्रिकेटच्या मैदानात लगावले. फुलटॉस आलेला बॉल त्यांनी हा असा सीमारेषेपार टोलावला. मैदानात हात आजमावून झाल्यावर त्यांनी शाब्दिक फटकेबाजीही केली.  पंचांचा निर्णय योग्य असतो आणि तो मान्य करावा लागतो असं सांगत त्यांनी  क्रिकटच्या मैदानातून अप्रत्यक्षपणे भरत गोगावलेंना लगावलाय.

हेही वाचा : अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना राजीनाम्याची सूचना? दिली नैतिकतेची शिकवण

 

फटकेबाजी करण्यासाठी मोकळं मैदान आणि समोर टार्गेट असेल तर येवढ्यावरच थांबतील ते सुनील तटकरे कसले. क्रिकेटच्या मैदानात शांत असलेला कॅप्टन कूल असेल तर मॅचमध्ये यश मिळतं नाहीतर मॅचची वाट लागते असा टोलाही त्यांनी नाव न घेता भरत गोगावलेंना लगावलाय. आता सूनिल तटकरेंनी टीका केल्यानंतर मग भरत गोगावले मागे कसे राहणार. त्यांनीही तटकरेंच्या आरोपांना त्याचा भाषेत उत्तर दिलंय.

रायगडमध्ये आणि तिघे खेळाडू आहोत तर त्यांच्या एकच असल्याचा टोला शिवसेना नेते महेंद्र दळवींनी लगावलाय. मैदान राजकीय असो की क्रिकेटच राजकीय नेते  फटकेबाजी करायचं काही सोडत नाही.. त्याचीच प्रचिती रायगडमधील क्रिकेटच्या मैदानात आलीय. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू असलेली पॉलिटीकल मॅच आणखी किती दिवस सुरू राहणार असं रायगडची जनता विचारु लागलीये.