Lord Ram Sita Conversation Story By Indresh Kumar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेल्या कामागिरीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अहंकारी पक्षाला प्रभू रामचंद्रांनी 241 वरच रोखलं असं टोला इंद्रेश कुमार यांनी राजस्थानमधील कानोता गावामधील रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन सोहळ्यात लगावला आहे. इंद्रेश कुमार यांनी केवळ सध्याच्या परिस्थितीवरुन टीका केली असं नाही तर श्रीराम आणि सीता मातेची एक कथा सांगत त्यांनी भाजपाचे कान टोचले.
प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या त्यागातून भाजपाने शिकवण घ्यावी असा सल्ला इंद्रेश कुमार यांनी आपल्या जाहीर भाषणामधून दिला. "राम दर 100 वर्षांनी आपल्या राज्यात अश्वेघ यज्ञ करायचे. त्यांच्या राज्यात कोणी उपाशी नव्हतं. त्यांनी कोणाला कधी शिक्षा दिली नाही. कोणाला दुखावलं नाही. रामाचं राज्य जेवढं मोठं होतं तितकं मोठं राज्य आतापर्यंत कोणाचंही नव्हतं," असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी सीता माता आणि राम यांच्यादरम्यानच्या एका संवादाची कथा सांगत त्यागाचं महत्त्वं अधोरेखित केलं.
"शेवटी एक काळ अला तेव्हा सीता मातेने प्रभू रामचंद्रांना प्रश्न अनेक प्रश्न विचारले. तुमच्या राज्यातील लोकांना अशी शंका येऊ लागली आहे की तुम्ही उपभोग घेण्याच्या दृष्टीने तर पावलं उचलणार नाही. तुम्ही तुमचे नातेवाईक, भाऊ आणि निकटवर्तीयांच्या हितांचं रक्षण करण्यात तर अडकून पडणार नाही ना? तुमच्यात सत्तेतचा अहंकार तर आला नाही ना? असे सीता मातेनं श्रीरामाला विचारले. सीतेचे हे प्रश्न ऐकून रामचंद्रांनी आता काय करावं असा प्रश्न विचारला. मी कोणत्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे? असं प्रभू रामाने सीतेला विचारलं. त्यावर सीतेने तुम्हाला प्रिय काय आहे? तुम्हाला जे प्रिय आहे त्या गोष्टीचा त्याग करा. असं केलं तर जग कायम तुमचं उदाहरण देत तुमचा सन्मान करेल. त्यामुळे श्रीरामाने चर्चा करुनच सीतेचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा असं ठरलं की जोपर्यंत सीता वनवासात असेल तोपर्यंत हनुमानजी त्यांचे सेवक आणि दूत बनून त्यांच्याबरोबर राहतील," अशी गोष्ट इंद्रेश कुमार यांनी आपल्या भाषणात सांगितली.
नक्की वाचा >> 'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा
"जोपर्यंत सीता माता परित्यागात राहिली तोपर्यंत हनुमान सेवक बनून तिची सेवा करत राहिले. राम काय विचार करतात हे सीता मातेला ठाऊक होतं. सीता माता काय करतेय हे सुद्धा रामचंद्राला ठाऊक होतं. यानंतर राम जितके वर्ष जिवंत राहिले तितके वर्ष त्यांनी राजेशाही उपभोग स्वीकारले नाहीत. त्यांनी त्या सर्व गोष्टींचा त्याग केला. राम राजमहलामध्ये चटईवर झोपायचे. ते सिंहासनावरही बसत नव्हते," असं इंद्रेश कुमार म्हणाले. या माध्यमातून इंद्रेश कुमार यांनी भाजपाला त्यागाचं महत्व अधोरेखित करुन सांगितलं.