पुन्हा थैमान? चीनमध्ये सापडला कोरोनापेक्षाही डेंजर व्हायरस; कोणत्याही प्राण्यापासून होणार संसर्ग?

New Bat Coronavirus In China: 2020 साली जगभरामध्ये फैलाव झालेला आणि लाखो लोकांनी प्राण गमावलेल्या कोरोना विषाणूचं उगम स्थान हे चीन असल्याचं उघड झालेले असतानाच आता पुन्हा अशाच एका साथीची टांगती तलवार जगावर आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 22, 2025, 02:35 PM IST
पुन्हा थैमान? चीनमध्ये सापडला कोरोनापेक्षाही डेंजर व्हायरस; कोणत्याही प्राण्यापासून होणार संसर्ग?
चीनमध्ये आढळून आला हा नवा विषाणू (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य रॉयटर्स)

New Bat Coronavirus In China: पाच वर्षांपूर्वी चीनच्या वुहान येथून जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगभरात प्रसार झाला होता. यानंतर पुढील अडीच ते तीन वर्ष या संसर्गाचा फटका संपूर्ण जगाला बसलेला. यामधून आता जग बऱ्याच प्रमाणात सावरलेलं असतानाच चिनी संशोधकांनी वटवाघुळांमधील एका नवीन कोरोना व्हायरस शोधून काढला आहे. या नव्या संशोधनामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. 2020 च्या जागतिक कोरोना साथीमध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण होणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

विषाणूंचा अभ्यास करणारे व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली (Shi Zhengli) यांच्या नेतृत्वाखालील चिनी संशोधकांच्या एका टीमने वटवाघुळांमधील नवा करोना व्हायरस शोधला आहे. या नवीन व्हायरसचे नाव ‘HKU5-CoV-2’ असं आहे. हा व्हायरस मर्बेकोव्हायरस (Merbecovirus) उपजनुकीय विषाणूंशी संबंधित आहे. तसेच हा नव्याने आढळलेला स्ट्रेन कोविड-19 प्रमाणेच आहे. कोविड-19 प्रमाणेच हा नवा विषाणू मानवी पेशींमधील ACE2 रिसेप्टरबरोबर जोडला जाऊ शकतो, असं संशोधनामधून समोर आल्याची माहिती 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिली आहे. एका अभ्यासाच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टमध्ये हे नमूद करण्यात आले आहे.

हा विषाणू अधिक वेगाने परसरण्याची भीती का?

HKU5-CoV-2 हा व्हायरस प्रयोगशाळेत मानवी पेशींना संक्रमीत करत असल्याचे आढळून आल्याचं 'सेल' (Cell) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे हा भविष्यात इतर प्राण्यांमध्ये पसरण्याचा धोका निर्माण झाला असून अशी शक्यता फेटाळता येत नाही. हा व्हायरस वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांमधील ACE2 रिसेप्टर्सबरोबर देखील एकत्र येऊ शकतो, म्हणजेच अनेक ‘इंटरमिडीएट होस्ट’च्या माध्यमातून याचे मानवांमध्ये संक्रमण होऊ शकते, ही बाब अधिक चिंताजनक आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोणत्याही सस्तन प्राण्यांपासून या विषाणूची लागण सहज होऊ शकते, असं म्हणता येईल. 

दिलासा एकच...

मानवी पेशींना संक्रमित करण्याची या व्हायरसची सध्याची क्षमता ही कोविड-19 विषाणूपेक्षा खूपच कमी आहे. मानवी पेशींना जरी हा व्हायरस संक्रमित करू शकत असला तरी मानवी लोकसंख्येला याचा लगेचच धोका असल्याचे आताच जाहीर कऱणं घाईचं ठरेल असं म्हणत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अजून याचे निरीक्षण करणे आवश्यक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पण यामुळे जागतिक माहामारी येणार का? याबद्दलची साशंकता अद्याप तरी कायम असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. 

कोविड-19 संदर्भातील दावा 'बॅटवुमन'ने फेटाळला

व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली यांच्या टीमने प्राण्यांमधून माणसात, तसेच मानवांमधून प्राण्यांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा म्हणजेच झुनॉटिक प्रसाराचा (zoonotic transmission) धोका लक्षात घेता वटवाघुळांमध्ये तयार होणार्‍या विषाणूंवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे, 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'शी संवाद साधताना सांगितलं आहे. कोविड-19 च्या उगम स्थानाबद्दल वादविवाद सुरू असतानाच या नवीन विषाणूचा शोध लागला आहे. शी झेंगली यांना वटवाघुळांमधील कोरोनाव्हायरसबद्दलच्या व्यापक संशोधनासाठी जगभरामध्ये ओळखले जाते. यामुळे त्यांना ‘बॅटवुमन’ असेही म्हटले जाते. त्यांनी वुहान इंस्टिट्यूटचा ऑफ व्हायरोलॉजीवर जगभरातून आरोप होत असताना या संस्थेची बाजू घेत आपली भूमिका मांडली होती. कोरोना व्हायरस प्रयोगशाळेतून बाहेर पडून तिथूनच त्याचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा देखील त्यांनी वेळोवेळी फेटाळला असून त्या यासंदर्भातील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.