वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर: आयुष्य कधी कठीण परीक्षा घेईल, याचा नेम नाही. पण अशा परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या व्यक्तींकडे समाज आदराने पाहतो. लातूरच्या औसा तालुक्यातील भादा गावातील निशा नागनाथ उबाळे ही अनेकांसाठी आदर्श ठरलीय. निशाची दहावीची परीक्षा सुरु आहे. परीक्षा सुरु असताना तिच्या वडिलांचे निधन झाले, त्यांचा मृतदेह अंगणात होता. घरात शोकाकुल वातावरण होते. तरीही निशाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत दहावीची परीक्षा दिली.
गेल्या काही दिवसांपासून निशाचे वडील नागनाथ उबाळे हे आजारी होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. परीक्षा सुरू असतानाच अचानक त्यांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारात राहायचं की पेपर द्यायचा? असा प्रश्न निशासमोर होता. आई आणि कुटुंबियांनी तिला समजावले. वडील नेहमी निशाच्या शिक्षणाला प्राधान्य देत होते. त्यामुळे निशाने धैर्याने निर्णय घेतला आणि परीक्षा केंद्र गाठले. डोळ्यांत अश्रू होते, मन गहिवरले होते, पण तिने पेपर लिहिला. तिच्या या जिद्दीला आणि संयमाला गावकऱ्यांनी सलाम केला.
निशा नागनाथ उबाळे ही भादा येथील शाळेत दहावीला आहे. तिचा मराठीचा पहिला पेपर होता. दहावीची तयारी करून परीक्षेला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केलेल्या निशाला नियतीने जबर धक्का दिला. निशाचे वडील नागनाथ उबाळे यांचे गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. घरात ती, आई, एक भाऊ आणि आज्जी असे चारच लोक. बापाच्या अचानक निधनाने निशा व तिचे कुटुंब सैरभैर झाले.
वडिलांच्या निधनाची बातमी कळताच निशाच्या हातातील पुस्तक गळून पडले. हंबरडा फोडून रडणाऱ्या निशाला आपल्या परीक्षेचा विसर पडला. मात्र निशाचे शिक्षक शिवलिंग नागापुरे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेम लटूरे यांनी निशाचा पेपर वाया जाऊ नये यासाठी निशाच्या नातेवाईकांची भेट घेतली. तिच्या कुटुंबातील व्यक्तींना विश्वासात घेतले. निशाचे समुपदेशन केले. डोळे पुसत निशा वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तयार झाली. एकीकडे बाप अनंतात विलीन होण्यासाठी परत कधीही न येणाऱ्या मार्गवर होता तर दुसरीकडे डोळे भरून अंतिम प्रवासाला निघालेल्या आपल्या बापाच्या अर्थीला पाहत निशा परीक्षेला जाण्यासाठी मोटारसायकलवर बसली होती. वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचून निशाने आपला पहिला पेपर दिला.
निशाच्या या धाडसाची चर्चा संपूर्ण गावभर आहे. 'आमच्या मुलीने जे केलं, ते खरोखर प्रेरणादायी आहे. वडिलांच्या स्वप्नांना ती खऱ्या अर्थाने न्याय देत असल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली. निशाच्या जिद्दीला शिक्षक, परीक्षाकेंद्रावरील कर्मचारी आणि परीक्षेसाठी आलेल्या इतर विद्यार्थ्यांनीही कौतुकाने शुभेच्छा दिल्या. हे उदाहरण सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे की कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाला महत्त्व द्यावे. निशाने दाखवलेला आत्मविश्वास आणि कर्तव्यभावना तिला भविष्यात नक्कीच यशस्वी करेल, असा विश्वास साऱ्यांना आहे.