कोल्हापुरात ठाकरे पक्ष आक्रमक, कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज

महाराष्ट्रातील बसच्या ड्रायव्हरला कन्नड संघटनांनी काळ फासल्यानंतर आता कोल्हापुरात ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी कर्नाटकच्या एसटी बसवर भगवा ध्वज फडकवला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 22, 2025, 03:42 PM IST
कोल्हापुरात ठाकरे पक्ष आक्रमक, कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज

Kolhapur : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. शुक्रवारी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. याचाच निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. 

विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटकमध्ये जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरली. तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला सज्ज इशारा देत कर्नाटकच्या बस वर भगवा ध्वज फडकवला. 

नेमकी घटना काय? 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस प्रवाशांना घेऊन मुंबईतून बंगळुरूला निघाली होती. अशातच ही बस चित्रदुर्गजवळ पोहोचली. यावेळी त्या ठिकाणी अचानक काही कन्नड कार्यकर्त्यांनी या बसला रोखले. बस रोखत त्यांनी कन्नड भाषेत घोषणा देखील दिल्या. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी बस चालकाला खाली उतरण्यास सांगितले आणि त्याच्यासोबत हुज्ज्त घातली. कन्नड कार्यकर्ते म्हणाले की, जर तुम्हाला कर्नाटकात यायचं असेल तर तुम्हाला कन्नड यायलाच पाहिजे. यानंतर वाद सुरु झाला. ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी एसटी बसला आणि चालकाळा काळे फासले आणि पसार झाले. 

गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद देखील सुरु आहे. या वादामुळे मोठ्या प्रमाणात पडसाद देखील उमटले आहेत. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची ही मुजोरी पहिल्यांदाच समोर आलेली नाहीये. याआधी देखील या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील अनेक वाहन चालकांवर हल्ला केला आहे. 2022 मध्ये देखील असाच हल्ला झाला होता. ज्यामध्ये दगडफेक करून बस आणि ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यासोबतच काही गाड्यांची नंबर प्लेट देखील तोडण्यात आल्या होत्या. 

हिंदी भाषिकांसाठी बंगळुरुमध्ये बंदी

काही दिवसांपूर्वी बंगळुरुमधील एक पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. ज्यामध्ये बंगळुरु उत्तर भारत आणि शेजारील राज्यांसाठी बंद आहे. ज्यांना कन्नड शिकायचं नाही  त्यांनी बंगळुरुला येण्याची आवश्यकता नाही असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.