पुणे : जीवाला जीव देणारा एक तरी मित्र असावा असं म्हणतात. मात्र पुण्यातल्या एका मित्रानं मित्राचाच जीव घेतलाय. अपघातानंतर मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून या मित्रानं पळ काढला. यामुळं दुसऱ्या मित्राला आपला जीव गमवावा लागलाय. अशी मैत्रीच्या नात्याला कलंक लावणारी घटना पुण्यात घडली आहे.
दुश्मन ना करे, दोस्त ने वो काम किया है, या वाक्यप्रमाणं खरोखरंच मैत्रीच्या नात्याला काळीमा फासण्याचं काम पुण्यातल्या एका मित्रानं केलंय. संतोष भिसे आणि कृष्णा ससाने हे जिवलग मित्र. 2 दिवसापूर्वी बँड पथकातल्या कामानंतर दोघेही दारू प्यायले आणि पहाटे गाडीवरुन घरी जात होते. तेव्हा बिबवेवाडी रस्त्यावर त्यांची दुचाकी आणि कारची धडक झाली. या अपघातात कृष्णा ससाने यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर कारचालक आणि दोघे जखमी मित्र पोलीस स्टेशनला गेले. मात्र, जखमी मित्राला सोबत नेण्याऐवजी किंवा रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला पोलीस स्टेशनजवळील मैदानावर एका गाडीत टाकून दुसरा मित्र संतोष भिसे हा पसार झाला. त्यामुळं वेळेवर उपचार न मिळाल्याने जखमी कृष्णा ससानेचा मृत्यू झाला.
हेही वाचा : महायुतीत पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच? अंतर्गत वादामुळे पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर?
बिबवेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पहाटे मैदानावरचा मृतदेह कृष्णा ससानेचाच असल्याची ओळख पटली. आणि त्याच्या मित्रानं तो तिथे ठेवल्याचं दिसलं. आता पोलिसांनी संतोष भिसेवर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून संतोषला अटक केलीये.अपघातातील जखमींना मदत करा असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र स्वत:च्या गाडीचा अपघात झाल्यावर मित्राला वाचवायचं कर्तव्यही संतोष भिसे विसरला. त्यामुळं वेळेत उपचार न मिळाल्यानं कृष्णा ससानेंना जीव गमावावा लागला. तेव्हा जिवलग मित्राला मरणाच्या दारात सोडणाऱ्या आरोपी संतोषला आणि दोषी कारचालकाला कायद्यानं चांगला धडा शिकवण्याची गरज आहे.