Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिरात सध्या एजंटकडून VIP दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप केला काही भाविकांनी केला आहे. प्रचंड गर्दी असल्यामुळे काही लोक या गर्दीतून वेळ वाचवण्यासाठी तत्काळ देवदर्शन मिळावं अशी अनेक भाविकांची इच्छा असते. मात्र, भोळ्या भाविकांची हिच अति घाई हेरून मंदीर परिसरात एजंट्सचा सुळसुळाट झालाय. जलद दर्शन घडवून देतो, असं सांगत एजंट भाविकांकडून हजारो रूपये लुटतात, असं येथे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलंय.
खास करून परराज्यातील भाविकांना हे एजंट आपलं लक्ष्य करतात आणि लुबाडतात. या जलद दर्शनासाठी 1 हजार ते 4 हजार रुपये फी घेत असल्याचं भाविकांनी सांगितलं.
काय म्हणाले भाविक?
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिरात ग्रुपसह आलेल्या भाविकांना चक्क दर्शनाचे पॅकेजेस दिले जातात. विशेष म्हणजे अशा प्रकारे व्हीआयपी दर्शनासाठी पैसे देताच अगदी अर्ध्या तासात दर्शन होत असल्याची माहिती येथील एजंट भाविकांना देतात आणि भाविकांची लुटतात. खरंतर मंदिर संस्थानने पाच जानेवारी पर्यंत भाविकांची गर्दी लक्षात घेता व्हीआयपी दर्शन बंद केलंय. मात्र तरीही व्हिआयपी दर्शन सुरूच असल्याचं दिसून येतंय. दरम्यान मंदिर विश्वस्तांनी भाविकांचे आरोप फेटाळलेत.
सध्या नाशिकमध्ये या काळाबाजारची प्रचंड चर्चा सुरूये. सर्रासपणे एजंट आर्थिक लुट करत असल्याने मंदिर संस्थांनची सुरक्षा यंत्रणा देखील यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सोबतच या सगळ्या प्रकाराला विश्वस्तांचा छुपा आशीर्वाद आहे की काय? असाही प्रश्न उपस्थित होतोय.