Income Tax Raid : सत्तेचा गैरवापर होतोय, महाराष्ट्रात असे राजकारण झालेले नाही - अजित पवार

 Income tax officer raid : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या साखर खारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली.  

Updated: Oct 7, 2021, 01:35 PM IST
Income Tax Raid : सत्तेचा गैरवापर होतोय, महाराष्ट्रात असे राजकारण झालेले नाही - अजित पवार title=

मुंबई : Income tax officer raid : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या साखर खारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली. (Ajit Pawar on relatives' sugar factory Income tax officer raid) याबाबत अजित पवार म्हणाले, आयटीने कुठे छापेमारी करावी, (Income Tax Raid) हा त्यांचा प्रश्न आहे. राजकिय हेतूने धाड टाकली का? हे तेच सांगतील. पण माझ्या बहिणींची 35 वर्षांपूर्वी लग्न झाली आहेत. एक कोल्हापुरात आणि दोन पुण्यात आहेत. त्यांच्यावर धाडी का टाकल्या ते मला समजू शकत नाही. अजित पवारचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर जनतेने विचार करावा. कोणत्या स्थरावर जाऊन संस्थांचा वापर केला जातो, राजकारण होत आहे. हे लक्षात येत आहे. मी आजवर असे काही पाहिले नाही. पवार साहेबांचा काहीही संबंध नसताना त्यांनाही ईडीची नोटीस आली होती. त्यातून लोकांनीही बोध घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले.

नेहरूंपासून आत्तापर्यंतची राजवट लोक पाहात आहेत. मीडियावर पण दबाव आहे का, असे मला वाटते. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली. पण माझ्या बहीणींवर धाडी टाकल्या, त्या केवळ माझ्या बहिणी म्हणून कारवाई करत असतील तर हे वाईट आहे. दरम्यान, लखीमपूरचा संबंध वाटत नाही, पण तुम्हाला जो अर्थ काढायचा आहे तो काढा, असे ते म्हणाले. (Ajit Pawar on relatives' sugar factory Income tax officer raid)

जर केंद्रीय संस्था आज काही करतात, तेव्हा तुम्ही म्हणता की ते नियमाने चालले आहे. पण तुमच्यावर धाड टाकतात का? त्यांच्या कोणत्याही कंपनीवर धाडी नाही पडत. कधी त्यांच्या नेत्यांच्या कंपनीवर कारवाई केलीय का, असा त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला.

महाराष्ट्रात असे राजकारण झाल्याचे पाहीले नाही. सत्तेचा गैरवापर इतका केल्याचे पाहीले नाही. राज्याचे राजकारण सुसंस्कृत आहे. एखाद्याकडून काही कमीजास्त झाले असले तरी असं राजकारण कधी झाले नाही. सत्तेचा गैरवापर कधी आम्ही केला नाही. निवडणुकांमधून लोक ठरवतील की, तुम्हाला सत्ता दिल्यानंतर त्याचा वापर तुम्ही कशासाठी करता ते. अजित पवार यांचे 30 वर्षांचे राजकारण तुम्ही पाहात आहात, असे ते म्हणाले.

काटेवाडीसह दौंड येथे छापा

बारामती तालुक्यातील काटेवाडीसह औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत आणि दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर व अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील  भारडगाव   येथील अंबालिका शुगर येथे आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली.

कर्जत येथील अंबालिका साखरकारखाना

अजित पवार यांच्या कर्जत येथील अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या करखाण्यावर आयकर विभागाचा छापा मारण्यात आला आहे. कारखान्यातील व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.

अजित पवार यांचे मामेभाऊ दिलीप कदम (रा. देवळाली ता. राहुरी) हे आहेत. ते या कारखान्यात संचालक आहेत. दिलीप कदम यांच्या घरी मात्र आयकर विभागाचे कर्मचारी गेले नसल्याची माहिती आहे.

जरंडेश्वर साखर कारखान्यावर छापा

सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने जरंडेश्वर कारखान्यावर छापा टाकला गेल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. 

कोल्हापुरमधील मुक्ता पब्लिकेशन हाऊस

अजित पवार यांची कोल्हापुरमधील बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर आयकरचे छापे टाकले गेले आहेत. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहोचले आणि त्यांच्या पुईखडी इथल्या घरात चौकशी सुरु केली.