BJP vs Shivsena: राज्यामध्ये ऐतिहासिक मताधिक्यासहीत सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये मागील काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. असं असतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र आता त्यात कपात केल्यानं शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला. अनेक आमदारांसोबत एकच बॉडीगार्ड राहणार तर मंत्र्यांचींही वाय प्लस दर्जाचे सुरक्षा असणार आहे. हा निर्णयावरुन पुन्हा एकदा फडणवीस-शिंदे वादासंदर्भात चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षाने या निर्णयावरुन निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुप्त संघर्ष सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेल्याचं चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात दोन्ही पक्षातील सुरू असलेल्या कुरघोडीचं राजकारणामुळे हा सुप्त संघर्ष टोकाला गेल्याचं बोललं जातंय. शिवसेना-भाजपमधील टोकाच्या संघर्षाला आता नवं कारण ठरलंय शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेली कपात. शिवसेना आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढण्यात आलीय. त्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज झाल्याची माहिती आहे.
याच मुद्द्यावरुन ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "त्यांनी या राज्यात वाय, झेड करून टाकली आहे. हे वेड्यांचे सरकार आहे. या मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे. मंत्रालयात फार गोंधळ आहे," असं राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. गृहनिर्माण खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. एसआरए म्हाडामध्ये अधिकाऱ्याची नेमणूक संबंधित मंत्र्यांना रोकडे देऊन केली जाते. लवकरच कोणत्या प्रकल्पासाठी किती पैसे दिले गेले याची माहिती मी उघड करेन," असंही राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> 'बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय...', 6500 डोंबिवलीकर बेघर होण्यावरुन राऊत संतापले
एकनाथ शिंदे समांतर मंत्रालय चालवत असल्याची चर्चा असून यासंदर्भातही राऊतांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. "एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं आहे फडणवीसांचे आदेश पाळू नका. अशा प्रकारचं आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं होतं. आता मंत्रालयातसुद्धा अंडरवर्ल्ड सुरू आहे. समांतर सरकार सुरू आहे. प्रतिसरकार सुरू असेल तर राजकीय अराजक निर्माण झाले आहे मंत्रालयात," असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊतांनी, "देवेंद्र फडणवीस हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य आराजगाच्या खालीच ढकलले जाईल," अशी भीती राऊतांनी व्यक्त केली. "56-57 आमदार ईव्हीएमच्या ताकदीवर निवडून आणले भाजपाने, ते आता सरकारला आव्हान देत आहेत," असंही राऊत म्हणालेत.