Natural Nail Care: आत्ताच जाणून घ्या नखांना सुंदर आणि लांब बनवण्याचे गुपित

स्त्रियांमध्ये लांब आणि आकर्षक नखे ठेवणे आजकालची फॅशनच बनली आहे. मात्र, नखे वाढवताना काही चुका केल्या तर त्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे नखे वाढवण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

Updated: Feb 18, 2025, 05:38 PM IST
Natural Nail Care: आत्ताच जाणून घ्या नखांना सुंदर आणि लांब बनवण्याचे गुपित

Nail Care Tips: सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? विशेषतः महिलांना सौंदर्याच्या बाबतीत नेहमी नीटनेटकेपणा हवा असतो. त्यात लांब आणि सुंदर नखे ठेवणे अनेक स्त्रियांचे सौंदर्यात अधिक भर घालते. पण या नखांची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित स्वच्छता, योग्य पोषण, योग्य उत्पादने आणि चांगल्या सवयींचा अवलंब केल्यास नखे मजबूत आणि निरोगी राहतील. सुंदर नखे मिळवण्यासाठी तुम्हाला नियमितपणे सलूनला भेट देण्याची गरज नाही. काही सामान्य सवयी बदलून तुम्ही सुंदर आणि आकर्षक नखे मिळवू शकता. त्यासाठी नखे वाढवण्याआधी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

1. नखांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची  

लांब नखांमध्ये धूळ आणि घाण सहज साचते. यामुळे बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नखांना नियमित स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. कोमट पाणी आणि सौम्य साबण वापरून नखे धुवावीत व स्वच्छ कापडाने कोरडी करावी. यामुळे नखं स्वच्छ राहतील आणि कोणताही संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल.

2. कमकुवत नखे धोकादायक ठरू शकतात  

जर तुमची नखे आधीच कमकुवत असतील, तर त्यांना लांब वाढवणे अधिक धोकादायक ठरू शकते. अशा नखांची सहज तूट होण्याची शक्यता असते, त्यामुळे दुखापत होऊ शकते. नखे मजबूत करण्यासाठी रोज नारळ तेल, बदाम तेल किंवा व्हिटॅमिन ई तेलाने मालिश करा. तसेच, नखे जास्त वेळ पाण्यात भिजू देऊ नका. असे केल्याने नखे मऊ आणि अशक्त होतात.

3. नेल पॉलिश आणि केमिकलयुक्त उत्पादने कमी वापरा  

नेल पॉलिशमुळे नखे सुंदर दिसतात, पण त्यात असलेले केमिकल्स नखांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विशेषतः अ‍ॅसिटोनयुक्त नेल पॉलिश रिमूव्हर नखांमधील नैसर्गिक ओलावा कमी करतो. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक आणि कमी केमिकल असलेले प्रोडक्ट्स वापरण्याचा प्रयत्न करा.

हे ही वाचाः तुमच्या लोकरीच्या कपड्यांची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

4. नखे चावण्याची सवय टाळा  

अनेक लोक तणाव किंवा कंटाळा आला की नखे चावण्याची सवय लावून घेतात. ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते, कारण त्यामुळे नखांवर जमा झालेले बॅक्टेरिया थेट तोंडात जातात आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. याशिवाय, नखांची नैसर्गिक आकारही बिघडतो. त्यामुळे ही सवय शक्यतो लवकर सोडण्याचा प्रयत्न करावा.

5. योग्य आहार घेणे गरजेचे  

नखे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. शरीरात बायोटिन, प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्न यांची कमतरता असेल, तर नखे कमजोर होऊन पटकन तुटू शकतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, अंडी, दूध आणि ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करा.