शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जात आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे असल्याचं म्हटलं आहे. यानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं चर्चा रंगली आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.
'विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना आम्ही सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र बसलो होतो. आमच्या समोर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले. तेव्हा लोकांनी मला विचारलं हे कसं काय? तेव्हा मी भेटायलाच पाहिजे, संवाद ठेवायलाच पाहिजे असं सांगितलं होतं. सर्वात मोठा पक्ष म्हणून जो विरोधी पक्षात आहे, त्यांच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेणं क्रमप्राप्त आहे. जो संवाद तुटला आहे, तो व्हायलाच हवा".
पुढे ते म्हणाले, "आमच्या पक्षातून गेलेल्या अजित पवारांनाही ते भेटले होते, आम्ही कुठे काय बोललो होतो? तुम्ही व्यासपीठ शेअर केलं. भेटलात म्हणून त्यांचे झालात असं होत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणतील सोज्वळ, सुशील आणि त्यानुसार जे वागणं व्हायचं ते दिसत नाही".
"एकदा प्रल्हाद अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर वार केला होता. दुसऱ्या दिवशी चव्हाणांनी अत्रेंची भेट घेतली होती. वेणुताईंवर 1942 च्या आंदोलनात लाठीचार्ज झाला आणि त्यामुळे मुलं जन्माला घालू शकत नाही ही वेदना समजावून सांगितली. यानंतर अत्रे बाहेर आले आणि अख्ख्या महाराष्ट्रासमोर दिलगिरी व्यक्त केली. आपल्या महाराष्ट्राने त्या उंचीचं राजकारण पाहिलं आहे. आता हे काय बघत आहोत. कोणाला उचलायचं जेलमध्ये टाकायचं, केसमध्ये फसवायचं, सुप्रीम कोर्टात वकील लावायचे, पोलीस घरी पाठवायचे, पण यांच राजकारण संपवा हे अनुभवत आहोत. या राजकारणाला छेद देणारे शरद पवार उदाहरण आहेत," असंही त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतील मतभेदांसंदर्भात विचारलं असता त्यांनी सांगितलं, "थोडेफार मतभेद असतात. मतभेदातून मनं साफ होतात. याच्यातून खूप लोकांची मनं साफ होतील. माझं आणि कोणाचं पटत नाही म्हणून शरद पवारांनी लाथ घालावी याची अपेक्षाच चुकीची आहे".
संजय राऊतांच्या टीकेवर ते म्हणाले, "त्यांच्या मनात शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत. त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायलं हवं हे सांगणंही उचित नाही. शरद पवार तुम्हाला कोणाला भेटावं सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप घेतला आहे का? आम्हालाही उद्धव ठाकरे अजित पवारांसोबत असतात तेव्हा वाईट वाटतं. सर्वात जास्त धोका अजित पवारांनी दिला आहे. मग तुम्ही कसे भेटायला गेलात हे आम्ही किंवा शरद पवरांनी तुम्हाला विचारलं का? राजकारणात असं चालत नाही".
"राजकारणातला संवाद वाढवायला हवा असं फडणवीस म्हणाले होते. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याशिवाय लोकशाहीतला जिवंतपणा दिसणार नाही. मुर्दाड झालेली लोकशाही दिसत आहे. ही पोलिसांची राज्यव्यवस्था नाही. पोलिसांचा ज्याप्रकारे वापर होत आहे तो फडणवीसांनी थांबवला पाहिजे. विकासकामं थांबवणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. आमच्या 5 वर्षानंतर राजकारण संपवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आम्हालाही तसंच वागावं लागेल", असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.