2025 मध्ये नोकरकपात? आंतरराष्ट्रीय कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा, 1000 पेक्षा जास्त जणांना पाठवले ई-मेल

अमेरिकेन मल्टिनॅशनल बँक जेपी मॉर्गन चेसच्या मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्यांना कळवण्यास सुरुवात केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 13, 2025, 07:16 PM IST
2025 मध्ये नोकरकपात? आंतरराष्ट्रीय कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा, 1000 पेक्षा जास्त जणांना पाठवले ई-मेल title=

2025 वर्षाला सुरुवात झाली असून, फेब्रुवारी महिन्यातच नोकऱ्यांवर गदा येताना दिसू लागली आहे. अमेरिकेन मल्टिनॅशनल बँक जेपी मॉर्गन चेसने कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरकपातीसंबंधी माहिती देण्यास सुरुवात केली असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

Barron's  ने या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे की, जेपी मॉर्गन चेसच्या व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारीमध्ये 1000 पेक्षा कमी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाईल आणि बँक मार्चच्या मध्यात, मे, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कपातीची घोषणा करण्याची योजना आखत आहे.

"आम्ही नियमितपणे आमच्या व्यावसायिक गरजांचा आढावा घेतो आणि त्यानुसार आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये बदल करतो," असं बँकेच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला ईमेल केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. "आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये भरती करत राहतो आणि ज्यांना नोकरकपातीचा फटका बसला आहे त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. हा आमच्या व्यवसायाच्या नियमित व्यवस्थापनाचा एक भाग आहे आणि खूप कमी संख्येने कर्मचाऱ्यांवर परिणाम करतो," असंही त्यांनी म्हटलं आहे. 

२०२४ च्या अखेरीस, बँकेत 3 लाख 17 हजार 233 कर्मचारी होते. कर्मचारी कपात तिच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 0.3 टक्के इतकी असेल. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बँकिंग क्षेत्राच्या ऑपरेटिंग वातावरणात बरीच सुधारणा झाली आहे. मालमत्तेच्या बाबतीत सर्वात मोठी अमेरिकन कर्जदाता असलेल्या जेपी मॉर्गनने 2024 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक नफा कमावला आहे.

मेटामध्ये कर्मचारी कपात

अलीकडेच, मेटाने आपल्या कर्मचाऱ्यांना मेमो पाठवला आहे. यामध्ये त्यांनी नोकरकपातीची तयारी केली जात असून मशीन लर्निंग अभियंत्यांच्या नियुक्तीला गती देण्याचे काम सुरू केलं असल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेसह बहुतेक देशांमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 5 वाजता कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील असं सूचनेत म्हटलं आहे.

जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड्समधील कर्मचाऱ्यांना स्थानिक नियमांमुळे कपातीतून सूट देण्यात येईल, तर युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील डझनभराहून अधिक देशांमधील कर्मचाऱ्यांना 11 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सूचना मिळतील, असं रॉयटर्सने मेमोचा हवाला देत सांगितलं आहे.