Chhagan Bhujbal On Devendra Fadanvis Meet: फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी थेट बोलून देखील दाखवली आहे. असं असतानाच आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर या दोन नेत्यांची भेट झाली. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीत नेमकं काय घडलं याचे उत्तर छगन भुजबळ यांनीच दिलं आहे.
छगन भुजबळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी आणि मंत्रिमंडळ या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे भुजबळांनी सांगितलं आहे. बैठकीनंतर भुजबळांनी माध्यमांसोबत संवाद साधला तेव्हा 8-10 दिवसानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भुजबळांनी म्हटलं आहे की, 'आज मी आणि समीर भुजबळ दोघांनी मुख्यंमंत्र्यांची भेट घेतली. अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक आणि राजकीय विषयदेखील होते. काय, काय घडलं आणि काय चालु आहे, यासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातूनबऱ्याचशा गोष्टी पाहिल्या आहेत. महायुतीला जो महाविजय मिळाला आहे त्यामागे ओबीसीचे पाठबळ आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभलं. त्याचासुद्धा मोठा वाटा आहे. ओबीसींनी विशषेतः आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याचे आभार मानले पाहिजेच. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मलादेखील आहे. ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही,' असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचे भुजबळांनी सांगितलं.
'राज्यात जे काही सुरू आहे. आत पाच सहा दिवस शाळा कॉलेजचा सुट्ट्या आहेत. राज्यात वेगळं वातावरण आहे. 8 ते 10 दिवस तुम्ही मला द्या. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि आपण निश्चित यावर मार्ग काढू यावर, असं फडणवीस म्हणाले. तसंच, मला विनंती केली की ओबीसी नेत्यांना सांगा मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींनी पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या,' असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.