Infosys Mass Layoff: इन्फोसिसने एकाचवेळी 400 कर्मचाऱ्यांना काढलं, गेटवर लावले बाऊन्सर्स!

Infosys Layoff: देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने साधारण 400 फ्रेशर्सना नोकरीतून काढलंय.

Pravin Dabholkar | Updated: Feb 7, 2025, 08:53 PM IST
Infosys Mass Layoff: इन्फोसिसने एकाचवेळी 400 कर्मचाऱ्यांना काढलं, गेटवर लावले बाऊन्सर्स! title=
इन्फोसिस कर्मचारी कपात

Infosys Layoff: देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसने साधारण 400 फ्रेशर्सना नोकरीतून काढलंय.  या सर्व कर्मचाऱ्यांची भरती कंपनीकडून ऑक्टोबर 2024 मध्ये करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मैसूर कॅम्पसमध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. यानंतर अंतर्गत चाचणीच्या नावाखाली यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आयटी कर्मचारी संघटना एनआयटीईएसने यासंदर्भात माहिती दिली आहे. इन्फोसिसने कामावरुन काढलेल्या नवीन कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. याप्रकरणी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याची धमकी युनियनने दिली आहे. कंपनीविरुद्ध तात्काळ हस्तक्षेप आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आल्याचे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.

'नापास करण्यासाठी घेतल्या चाचण्या'

घडलेला प्रकार संपूर्णपणे चुकीचा आहे. कारण आम्हाला देण्यात आलेल्या टेस्ट खूप कठीण होत्या. या टेस्ट आम्हाला नापास करण्यासाठीच घेतल्या गेल्या होत्या. परीक्षेच्या निकालानंतर अनेक फ्रेशर्स टेन्शमध्ये आले आहेत. कारण त्यांना त्यांचे भविष्य आता अंधकारमय दिसू लागल्याची माहिती एका फ्रेशरने 'मनी कंट्रोल'शी बोलताना दिली. याहून धक्कादायक वृत्त सुत्रांच्या हवाल्याने पुढे येत आहे. फ्रेशर्सनी मोबाईल फोन बाळगू नयेत यासाठी कंपनीने बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत, अशी माहिती समोर आलीय. एवढेच नव्हे तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॅम्पस रिकामा करण्यास सांगण्यात आले होते, असेही सुत्रांनी सांगितले. तर यावर इन्फोसिसने स्पष्टीकरण देत आमच्याकडून बाउन्सर तैनात करण्यात आले नव्हते असे इन्फोसिसकडून सांगण्यात आले. 

कंपनीने काय म्हटलंय?

400 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याप्रकरणी कंपनीला एका ई-मेलद्वारे प्रश्न विचारण्यात आला. याला कंपनीने उत्तर दिले आहे. इन्फोसिसमध्ये आमची भरती प्रक्रिया खूप कडक आहे. ज्यामध्ये सर्व नवीन भरती होणाऱ्यांना अंतर्गत मूल्यांकन उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. आणि त्यानंतर आमच्या म्हैसूर कॅम्पसमध्ये प्रशिक्षण दिले जाते, असे कंपनीने म्हटले. सर्व नवीन कर्मचाऱ्यांना मूल्यांकन उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी दिल्या जातात. यात अनुत्तीर्ण झालेल्यांना कंपनीसोबत पुढे काम करता येत नाही. कंपनीच्या करारातदेखील यासंदर्भात लिहिले गेले असल्याचे सांगण्यात आले. ही प्रक्रिया 2 दशकांहून अधिक काळापासून सुरू आहे. आमच्या ग्राहकांना उच्च-गुणवत्तेच्या प्रतिभेची उपलब्धता देण्यासाठी ही टेस्ट असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. 

सरकारकडे कारवाईची मागणी

इन्फोसिसमधून काढून टाकण्यात आलेले नवीन कर्मचारी काही महिन्यांपूर्वीच ऑक्टोबर 2024 मध्ये भरती झाले होते. या कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑफर लेटर मिळण्यासाठी आधीच वाट पहावी लागली, असे नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ने म्हटलंय.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आम्ही कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करत आहोत. ज्यामध्ये इन्फोसिसविरुद्ध त्वरित हस्तक्षेप आणि कठोर कारवाईची मागणी करत असल्याचे NITES ने पुढे म्हटले आहे.