Salman Khan Farm House Attack Case: 2024 मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये दोन लोकांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सलमान खानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. मात्र, अशातच आता या दोन्ही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सलमान खानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. ज्यामध्ये कोर्टाच्या म्हणण्यांनुसार, सलमान खानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा कट ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये रचला गेला होता त्या ग्रुपमधील आरोपींच्या उपस्थितीशिवाय त्यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत.
न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना जामीन मंजूर
सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवरील हल्लाचा कथित कट रचणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये आरोपी वासपी महमूद खान उर्फ वसीम चिकना आणि गौरव विनोद भाटिया उर्फ संदीप बिश्नोई यांना अटक करण्यात आली होती. कोर्टामध्ये बचाव पक्षाचे वकील तन्वीर अझीझ पटेल आणि असित यशवंत चावरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आणि केवळ व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये असल्याने त्यांना आरोपी मानले जाऊ शकत नाही असं सांगितले.
मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेरही झाला होता गोळीबार
14 एप्रिल 2024 रोजी सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार झाला होता. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार केला होता. या प्रकरणाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती. गोळीबार प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली होती.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं म्हटलं तर सलमान हा शेवटचा 2023 मध्ये 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता. सध्या चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपट 'सिकंदर' ची उत्सुकता आहे. असं म्हटलं जात आहे की, हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे.