Eknath Shinde Shivsena MLA On MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकत्याच मुंबईत झालेल्या राज्य स्तरीय पादाधिकारी मेळाव्यामधून मतदानावर शंका उपस्थित केली. राज ठाकरेंनी लोकसभेचा निकाल विधानसभेला अचानक कसा फिरला? अशा अर्थाचा प्रश्न विचारला. राज ठाकरेंनी यावेळेस अजित पवारांच्या पक्षाला विधानसभेला 42 जागा कशा मिळाल्या असा सवाल विचारला. एवढ्यावरच न थांबता संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरातांसारखा नेता पडला, असं म्हणत आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र आता राज ठाकरेंना संगमनेरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि बाळासाहेब थोरातांना पराभूत करुन 'जायंट किलर' ठरलेल्या अमोल खताळ यांनी संगमनेर भेटीचं आमंत्रण दिलं आहे. अमोल खताळ यांनी खोचक शब्दांमध्ये राज यांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मागील 8 विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजेच तब्बल 40 वर्षांपासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केला. महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकालांमध्ये थोरातांच्या पराभवाचा समावेश होतो. त्यामुळेच राज यांनीही या पराभवाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. मात्र थोरात यांचा पराभव का झाला हे पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरला भेट द्यावी असं थोरातांना पराभूत करणारे विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी म्हटलं आहे.
अमोल खताळ यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन राज ठाकरेंचं अकाऊंट टॅग करत एक पोस्ट केली आहे. "राज ठाकरे साहेब, संगमनेरच्या जनतेने पाणीटंचाई, बेरोजगारी, अपूर्ण विकास व जनतेकडे दुर्लक्ष यामुळेच 40 वर्षांपासून निवडून दिलेल्या बाळासाहेब थोरात यांना नाकारलं आहे. 40 वर्षे आमदार, 17 वर्षे मंत्री असून पण तालुक्यात साधी एमआयडीसी नाही, शेतीला पाणी नाही. मग जनतेने मत का द्यावी?" असा सवाल अमोल खताळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे बोलताना खताळ यांनी, "राजसाहेब मुंबईच्या बाहेर या, संगमनेर पाहा, संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते, मतांच्या माध्यामतून जनतेन परिवर्तन करून दाखवले. हे सत्य तुम्हाला समजेल! बाकी कोणाच्या तरी सांगण्यावरून पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी संगमनेर मध्ये आमंत्रित करतोय," असंही म्हटलं आहे.
आता राज ठाकरे अथवा मनसे पक्ष खताळ यांच्या या आमंत्रणाला काय प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.