MP Sanjay Raut On Eknath Shinde & BJP Relation: "आपले `लाडके' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपपुरस्कृत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंधच राहिलेले नाहीत याची प्रचिती देणारे प्रसंग रोज घडत आहेत. त्यामुळे जनतेचे मनोरंजन सुरू आहे. त्यात भाजप कोट्यातील मंत्री गणेश नाईक यांनी शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात नियमित जनता दरबार घेणार असे जाहीर करून `कहर'च केला आहे व त्यामुळे नवी वादाची ठिणगी पडली. यावर शिंद्यांच्या लोकांनी दंड थोपटले व सांगितले की, तसे असेल तर आम्ही नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात जाऊन दरबार भरवू. राज्याचे सरकार किती बेचव आणि अळणी आहे व आपापसातील मारामाऱ्यांमुळे प्रशासन व जनतेचे किती हाल होत आहेत त्याची फिकीर कुणालाच नाही," असा टोला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
"शिंदे गटाचे एक त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले. त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन गोंधळ वाढवला. "शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही," असा दावा राऊत यांनी 'सामना'मधील रोखठोक सदरामधून केला आहे. पुढे राऊतांनी त्या आमदाराबरोबर झालेल्या संवादाचा तपशील दिला आहे.
"मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेले नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय?" - मी.
"ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत." - आमदार.
"शिंदे यांना धक्का बसला आहे काय?" - मी.
"ते मनाने कोलमडले आहेत." - आमदार.
"का? काय झालं?" - मी.
"निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते. शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंदे यांना वाटते",- आमदार महोदय.
नक्की वाचा >> थोरात कसे पराभूत झाले? विचारणाऱ्या राज ठाकरेंना शिंदेंच्या आमदाराचा टोला; म्हणाला, 'राजसाहेब मुंबईबाहेर...'
या आमदाराने पुढे माहिती दिली ती महत्त्वाची. "शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टाप केले जात आहेत असे शिंदे यांना खात्रीने वाटते व दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे," असं हा आमदार म्हणाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. "महाराष्ट्रातले राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हे दर्शविणारी ही हवेतली चर्चा आहे. शेवटी काय, तर भाजप कोणाचाच नाही," असं राऊत लेखात म्हणालेत.