Pune Shankar Maharaj Math : महाराष्ट्रात हजारो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. पुण्यात एक विचित्र मंदिर आहे. या मंदिरात अगरबत्ती नाही तर सिगारेट पेटवली जाते. येथे येणारे भक्त मोठ्या श्रद्धेने सिगारेट अर्पण करतात. जाणून घेऊया हे मंदिर कोणते आणि येथे येणारे भक्त सिगारेट का पेटवतात?
सिगारेटचा नैवेद्य दाखवले जाणारे मंदिर म्हणजे पुण्यातील शंकर महाराजांचा मठ आहे. संत शंकर महाराज हे महाराष्ट्रातील एक महान आहेत. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात शंकर महाराजांचा मठ आहे. श्री शंकर महाराज आधुनिक काळाचे सत्पुरुष म्हणून ओळखले जातात. येथेच त्यांची समाधी आहे. श्री शंकर महाराज हे नाथ सिद्धांच्या परंपरेतील एक परिपूर्ण गुरु होते. आधुनिक युगातील महान योगी संतांपैकी एक होते. तसेच शंकर महाराजांचा जन्म 1800 च्या सुमारास मंगळवेढा येथे उपासनी नावाच्या कुटुंबात झाला.
भक्तांना ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. पुण्याच्या धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर आहे. हे मंदिर लाखो भक्तांचे श्रध्दा स्थान आहे.सुपड्या, कुंवरस्वामी, गौरीशंकर, देवियाबाबा, रहिमबाबा, टोबो, नूर महंमदखान, लहरीबाबा, गुरुदेव अशा अनेक नावांनी शंकर महाराज ओळखले जायचे.
श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वत: नेहमी म्हणत- सिद्धीच्या मागे लागू नका.त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी उपाधी लावल्या नाहीत. शंकर महाराज अलौकिक पुरुष होते असे मानले जाते. शंकर महाराजांना सिगारेट ओढायला आवडायची. यामुळेच शंकर महाराजांच्या मठात येणारे भक्त त्यांना मोठ्या श्रद्धेने सिगारेट अर्पण करतात.