Earthquake Zone 5 Regions: सोमवारी भल्या पहाटे दिल्लीमध्ये भूकंप झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. दिल्ली-एनसीआर परिसरात पहाटे 5 वाजताच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे दिल्लीकर घाबरुन घराबाहेर पळत होते. या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर 4.0 इतकी होती. मात्र, या भूकंपामुळे दिल्लीकरांचे अगदी मोठे नुकसान झाले असल्याचे वृत्त समोर आले नाही. तरीदेखील, सर्वांनाच अचानक धडकी भरवणारा भूकंप येण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घ्या, भूकंप येण्यामागचं वैज्ञानिक कारण. तसेच, भारतातील कोणत्या भागात भूकंपाचा सर्वाधिक धोका आहे?
वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीच्या गर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि 'भूकंप लहरी' तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. यामुळे भूकंप येतो.
पृथ्वीच्या टॅक्टोनिक थरामध्ये होणारी हालचाल भूकंपाला कारणीभूत असते. पृथ्वी ही सुमारे 12 चकत्यांवर किंवा थरांवर अवलंबून असते. हे थर कालांतराने मंद गतीने आपली जागा बदलत असतात. जेव्हा जेव्हा या ते एकमेकांवर आदळतात किंवा सरकतात तेव्हा तिथून ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळेच भूकंपाचे झटके जाणवू लागतात.
'रिंग ऑफ फायर' या क्षेत्रात जगातील सर्वाधिक भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. या क्षेत्रात विशेषत: इंडोनेशिया, जापान आणि अमेरिकेतील काही भागांचा समावेश आहे. भारतात अलिकडच्या काही वर्षांमध्ये भूकंप येण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतातील भूकंपग्रस्त काही भागांमुळेच भारताला भूकंपाचा धोका असणाऱ्या क्षेत्रांमध्ये गणले गेले आहे.
भूकंपाचा धोका विचारात घेऊन भारतातील भूकंपाचे क्षेत्र 5 झोनमध्ये विभागले गेले आहेत.
झोन 5- सर्वाधिक धोका: या झोनमध्ये ईशान्य भारत, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातचा कच्छ प्रदेश, उत्तर बिहार तसेच अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश आहे. येथे वारंवार भूकंप होत असतात.
झोन 4- उच्च प्रमाणात धोका: यात जम्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशचा उर्वरित भाग, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशचा उत्तरेकडील भाग, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग समाविष्ट आहे.
झोन 3- मध्यम धोका: यामध्ये केरळ, बिहार, पश्चिम राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पूर्व गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
झोन 2- कमी धोका: या झोनमध्ये राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांचा समावेश आहे.
झोन 1- सर्वात कमी धोका: या झोनमध्ये मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भाग, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व महाराष्ट्र आणि ओडिशाच्या काही भागांचा समावेश आहे.
तुमचे डोके आणि मान (शक्य असल्यास तुमचे संपूर्ण शरीर) एका मजबूत टेबल किंवा डेस्कखाली झाका. जर जवळपास कोणताही आश्रय नसेल, तर आतील भिंतीजवळ किंवा सखल फर्निचरजवळ जा आणि तुमचे डोके आणि मान तुमच्या हातांनी झाका.