Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!

Khatabook Success Story:  व्यावसायीकांना डिजिटल पर्याय उपलब्ध करुन देण्यात या स्टार्टअपने महत्त्वाची भूमिका बजावली.

Pravin Dabholkar | Updated: Feb 21, 2025, 10:11 PM IST
Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!
खाताबुक स्टार्टअप

Khatabook Success Story: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप्सविषयी खूप बोलंल जातंय. विशेष करुण तरुण पिढी स्टार्टअपच्या मागे जाताना दिसतेय, जे देशाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून चांगले लक्षण आहे. यामुळे नवोपक्रम आणि उद्योजकतेच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे. उद्योजक अशा नव्या कल्पना, क्रिएटिव्हीटी घेऊन मार्केटमध्ये उतरत आहेत. त्यांच्या या कल्पनांना उल्लेखनीय यश तर मिळतच आहे. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्यादेखील ते लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. 

व्यावसायीकांना डिजिटल पर्याय 

तुम्ही खाताबूक या स्टार्टअपची जाहिरात पाहिली असेल. खाताबूक हे एक बुककीपिंग स्टार्टअप आहे. 2018 मध्ये आशिष सोनोने, धनेश कुमार, वैभव कल्पे, जयदीप पूनिया आणि रवीश नरेश यांनी या स्टार्टअपची सुरुवात केली होती. सर्वसाधारणपणे व्यापारी दुकानदार हे पारंपारिक मॅन्युअल अकाउंटिंग करताना आपण पाहिले असेल. त्यांना डिजिटल क्षेत्रात आणून त्यांचे काम आणखी सोपे करण्याची कल्पना या युवकांना सुचली. मग कर्नाटकातील बेंगळुरू येथील खाताबूक स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय मालकांना आणि व्यापाऱ्यांना त्यांचे खाते व्यवस्थापित करण्यात आणि ऑनलाइन पेमेंट घेण्यास त्यांनी मदत केली. व्यावसायीकांना डिजिटल पर्याय उपलब्ध करुन देण्यात या स्टार्टअपने महत्त्वाची भूमिका बजावली.

आयआयटी मुंबईमधून घेतली पदवी

खाताबूक हे काईट टेक्नॉलॉजीजने विकसित केलेले अॅप आहे. जे व्यापाऱ्यांना त्यांचे स्टॉक रेकॉर्ड व्यवस्थापित करण्याचा सोपा मार्ग देते. या अॅपद्वारे यूजर्स खाती सहजतेने हाताळू शकतात आणि आपल्या क्रेडिट बॅलन्सचे निरीक्षण करू शकतात. खाताबुकची सेवा ही वापरण्यास विनामूल्य आहे. यात तुम्हाला सुरक्षित व्यवहारांची हमी देण्यात येते. कर्नाटकातील बेंगळुरू येथील रवीश नरेश हे खताबुकचे सीईओ म्हणून काम करतात. त्यांनी प्रतिष्ठित आयआयटी मुंबईमधून पदवी पूर्ण केली. नरेश हे याआधी हाऊसिंग डॉट कॉमचे सह-संस्थापक आणि सीओओ होते.

 4 हजार 500 कोटी रुपयांचे टर्नओव्हर 

रवीश आणि त्यांच्या टीमने भारतीयांमध्ये एक मनोरंजक ट्रेंड पाहिला. ज्यामध्ये लोकांना डिजिटल व्यवहार करणे खूप सोयीस्कर वाटू लागले. असे असले तरी बरेच लोक अजूनही त्यांत्या खात्याचा मॅन्युअली रेकॉर्ड ठेवतात. रेकॉर्ड ठेवण्यासाठी ते पारंपारिक पद्धतींवर अवलंबून असतात. हे निरीक्षण समोर आल्याने अशा व्यापाऱ्यांना ऑनलाइन अकाउंटिंगकडे वळण्यास प्रोत्साहित करण्याचा विडा या टिमने उचललाय. वापरायला सोपे आणि सुरक्षित अशा खताबुक अॅपचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आलाय. ज्याला व्यापाऱ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. स्थापनेवेळी खताबुकने माजी भारतीय क्रिकेट कर्णधार एमएस धोनीकडून गुंतवणूक घेतली. कमी कालावधीत म्हणजेच 2023 पर्यंत खाताबुक स्टार्टअपने 4 हजार 500 कोटी रुपयांचे टर्नओव्हर केले.