Warning To Central Railway: सावंतवाडी पॅसेंजर (Sawantwadi Passenger) गाडीवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मध्य रेल्वेला थेट रेल रोकोचा इशारा दिला आहे. एकीकडे कोकणातील चाकरमानी शिमग्याला कोकणात जाण्याच्या तयारीत असतानाच हा इशारा देण्यात आल्याने चाकरमान्यांना या आंदोलनाचा फटका बसणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
दादरवरून सोडण्यात येणारी सावंतवाडी पॅसेंजर गाडी दिवा येथून सोडण्यात येत असल्याने कोकणातील चाकरमान्यांना त्याचा फायदा होत नसल्याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून सोडावी अशी मागणी ठाकरेंच्या पक्षाने केली आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मध्य रेल्वेला डेडलाइनही दिली आहे. सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पूर्वीप्रमाणे दादरमधून सोडण्याचा निर्णय 1 मार्चपूर्वी घेतला नाही तर रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना भेटून दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने महाव्यवस्थापक मीना यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यासाठी रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेला दोनदा पत्र दिले होते आणि कार्यवाहीला गती देण्याची मागणी केली होती. त्याकडे रेल्वे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. दोन्ही पॅसेंजर लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन देऊन 40 दिवस उलटले तरी प्रशासन ढिम्म राहिले. कोकणी जनतेवर केल्या जाणार्या या अन्यायाला आमचा पक्ष वाचा फोडेल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
मध्य रेल्वेचं मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर महाराजांचा पुतळा बसविण्याच्या मागणीकडे प्रशासन सतत्याने दुर्लक्ष करत आहे. मात्र, आज आम्ही पुतळा कसा असावा, याचे मॉडेलच मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहे. तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीच्या आत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करू, असे सावंत यांनी सांगितले आहे.
नक्की वाचा >> मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडत असाल तर ठाण्याकडील प्रवास टाळाच; कारण...
शिवडी, परळ, एल्फिन्स्टन, करी रोड येथील पुलांची प्रलंबित कामे लवकरात लवकर व्हावीत, अशा मागण्या महाव्यवस्थापक यांच्याकडे केल्याची माहिती खासदार सावंत यांनी या भेटीनंतर दिली आहे.
रेल्वे महाप्रबंधक श्री. धर्मवीर मीना तसेच अन्य अधिकार्यांची भेट घेऊन रेल्वेशी निगडीत अनेक समस्या व मागण्यांसंदर्भात चर्चा केली आणि मागणीपत्रे दिली.
काही प्रमुख मागण्या :
सीएसएमटीसमोर वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा :
गुजरातच्या केवडीया स्टेशनसमोर… pic.twitter.com/1ZBBQuupQ5— Arvind Sawant (@AGSawant) February 21, 2025
होळीनिमित्त मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने सीएसएमटी – मडगाव, एलटीटी – मडगाव अशा रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01151 सीएसएमटी – मडगाव विशेष रेल्वेगाडी सीएसएमटीवरून 6 मार्च, 13 मार्च रोजी मध्यरात्री 12.20 वाजता सोडण्यात येणार आहे. ही रेल्वेगाडी अनुक्रमे 7, 14 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 मडगाव – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी मडगाव येथून 6 मार्च, 13 मार्च रोजी दुपारी 2.15 वाजता सोडण्यात येणार असून ही रेल्वेगाडी त्याच दिवशी मध्यरात्री 3.45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव 13 मार्च, 20 मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10.15 वाजता सुटेल. ही रेल्वे अनुक्रमे 14 मार्च आणि 21 मार्च रोजी दुपारी 12.45 वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01130 मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी 14 मार्च, 21 मार्च रोजी मडगाव येथून दुपारी 1.40 वाजता सुटेल. ही गाडी 22 मार्च रोजी पहाटे 4.05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.