Indian Railway Rules : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांचं हित लक्षात घेत प्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सतत प्रयत्न केले जातात. प्रवासादरम्यान प्रवाशांना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा हा त्याच प्रयत्नांचा एक भाग. मग ती जेवणाची सुविधा असो, चहापाण्याची किंवा अगदी प्रवासादरम्यान दिल्या जाणाऱ्या चादर, टॉवेलांची. या सुविधांसह प्रवासी काही नियांचं पालन करण्यास बांधिल असतात. पण, अनेकदा काही मंडळी मात्र इथं नियमही झुगारुन लावतात. अशा परिस्थितीत मात्र प्रवासाला गालबोट लागून या मंडळींना शिक्षाही होऊ शकते.
रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये कायमच स्लीपर कोच अर्थात शयनयान विभागातील प्रवाशांना चादर, टॉवेल यांचा पुरवठा केला जातो. या रेल्वे विभागाच्याच वस्तू असून, प्रवासानंतर त्या पुन्हा आसनावरच सोडणं अपेक्षित असतं. पण, काही प्रवासी मात्र चादरी, टॉवेल सोबत घेऊन जातात. अनेकदा हे अनावधानानं होतं किंवा मग जाणीवपूर्वक. पण, ही कृती एक कायदेशीर गुन्हा म्हणून गणली जाते.
रेल्वे प्रवासादरम्यान दिली जाणारी चादर किंवा टॉवेल प्रवाशांनी सोबत नेल्यास त्यांच्यावर रेल्वे संपत्ती अधिनियम 1966 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. ही कृती करताना पहिल्यांदा पडकले गेल्यास प्रवाशांना एक वर्षाचा कारावास आणि 1000 रुपये दंड होऊ शकतो. याशिवाय प्रकरण आणखी गंभीर असल्यास 5 वर्षांचा कारावास आणि दंड स्वरुपात मोठी रक्कमही भरावी लागू शकते. काही प्रकरणांमध्ये या दोन्ही शिक्षा एकाच वेळी लागू होतात.
सदर चोरीच्या प्रकरणांमुळे रेल्वेला दरवर्षी लाखोंच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. दरवर्षी रेल्वेतून लाखो ब्लँकेट, चादरी, उशी, टॉवेल चोरीला जातात. त्यामुळं या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी आणि अशा प्रवाशांना चाप बसवण्यासाठीच रेल्वेनं कारवाईचं पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा या नियमाचा विसर पडू देऊ नका.