loksabha Elections 2019 : निवडणूक तारखांवर दाक्षिणात्य नेत्यांचा 'राहू काळा'चा आक्षेप

रविवारी निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या सत्रांची घोषणा केली. पण.... 

Updated: Mar 11, 2019, 09:32 AM IST
loksabha Elections 2019 : निवडणूक तारखांवर दाक्षिणात्य नेत्यांचा 'राहू काळा'चा आक्षेप   title=

नवी दिल्ली : रविवारी निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या सत्रांची घोषणा केली. सात टप्प्यांमध्ये २०१९ च्या निवडणुका पार पडणार असून, आता राजकीय पटलावर त्याविषयीच्या हालचालींनाही सुरुवात झाली आहे. पण, या साऱ्यामध्ये दक्षिणेकडील काही नेतेमंडळींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची बाब त्यांनी थेट ज्योतिष विद्येशी जोडत या प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलं आहे. 

निवडणुकांच्या तारखांची घोषणा ही रविवारी न होता एका वेगळ्याच वेळी आणि दिवशी व्हायला हवी होती, असं म्हणत त्या नेतेमंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून ते ६ वाजेपर्यंतचा काळ हा राहू काळ असल्यामुळे अशा वेळी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करणं योग्य नसल्याची बाब त्यांनी मांडली. तर काही बड्या नेतेमंडळींनी यानर प्रश्नचिन्हं उपस्थित करत निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यासाठीच्या पत्रकार परिषदेच्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी केली होती. 

ज्योतिषविद्येत नमूद केल्यानुसार सूर्योदय आणि सूर्यास्तादरम्यानच्या काळात दररोज जवळपास ९० मिनिटांचा राहू काळ असतो. हाच मुद्दा अधोरेखित करत दक्षिण भारतातील काही नेत्यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यावर नाराजी व्यक्त केली. मुख्य म्हणजे फक्त नेतेमंडळीच नव्हे तर, काही राज्यपालांनीही याविषयी नाराजी व्यक्त केली. 

कशी पार पडणार आहे २०१९ लोकसभा निवडणूक? 

देशातील जवळपास ५४३ मतदारसंघांत सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात ११ एप्रिल ते २९ एप्रिल या काळात चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. यंदाच्या निवडणुकांमध्ये एकूण ५४३ मतदारसंघांपैकी २८२ मतदारसंघांची गणितं ही नवमतदारांमुळे बदलणार आहेत. आंध्रप्रदेश, अरुणाचल, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागलँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगर, दीव-दमण, लक्षद्वीप, दिल्ली, पुद्दुचेरी आणि चंदीगढ या २२ राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल.