कारमध्ये खेळायला गेली शेत मजुरांची ४ मुलं, गुदमरून सर्वांचा जीव गेला

Crime News Today: कारमध्ये खेळत असताना चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 4, 2024, 06:33 PM IST
कारमध्ये खेळायला गेली शेत मजुरांची ४ मुलं, गुदमरून सर्वांचा जीव गेला title=
innocent children were playing in the farm owners car in gujrat

Crime News Today: गुजरातमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अमरेली जिल्ह्यातील एका गावात एकाचवेळी चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. एका मजुराचे कुटुंब एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. ऐन दिवाळीच्या दिवसांत घरात दुखाःचे वातावरण पसरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुलांचे आई-वडिल शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी मुलं तिथे खेळत होते. शेत मालकाने तिथेच कार लावली होती. मुलं त्या कारमध्ये खेळण्यासाठी गेली. तितक्यात दरवाजा आतून लॉक झाला आणि श्वास गुदमरल्याने चिमुरड्यांचा मृत्यू झाला. 

कसा झाला चारही मुलांचा मृत्यू 

पोलिस उपाध्यक्ष चिराग देसाई यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. अमरेलीतील रंधिया गावात ही घटना घडली होती. या मजुराचे कुटुंब मध्य प्रदेशमधील होते. आई-वडिल शेतात काम करत होते. सकाळी साधारण 7.30 वाजण्याच्या सुमारास मुलांचे आई वडिल शेतावर काम करण्यासाठी निघून गेले. सात मुलं घरात होते. घराच्या जवळच उभ्या असलेल्या शेत मालकाच्या कारमध्ये खेळण्यासाठी ते घुसले. मात्र, त्यांना कारचा अंदाज आला नाही. 

कारचा दरवाजा आतून लॉक झाला. दरवाजा उघडण्याचा सतत प्रयत्न करुनही त्यांना तो काही उघडता आला नाही. त्यामुळं चारही मुलांचा श्वास कोंडून मृत्यू झाला. चारही मुलांचे वय 2 ते 7 वर्ष इतकेच होते. मुलांचे आई-वडिल जेव्हा शेतातून घरी आले तेव्हा मुलं घरात नव्हते. त्यांनी मुलांना घराजवळ सगळीकडे शोधलं. मात्र त्यांना मुलं कुठेच सापडली नाहीत. 

संध्याकाळी जेव्हा शेतमालक घराजवळ आला तेव्हा कारमध्ये त्याला मुलं दिसली. त्याने लगेचच कारचा दरवाजा उघडला. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. कारमध्येच मुलांचे मृतदेह पडलेले होते. चिमुकल्यांचे मृतदेह पाहून आई-वडिलांना मोठा धक्का बसला. ऐन दिवाळीत घरात अघटित घडल्याने आई वडिल कोलमडून गेले होते. कारमालकाने या घटनेबाबत पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हसत्या खेळत्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.