प्रशांत अंकुशराव, झी 24 तास, मुंबई : आपल्या लाडक्या कुत्र्यासाठी कोण काय करेल, सांगता येत नाही. कुत्र्याचा विरह सहन न झालेल्या एका मालकिणीनं त्याला घरी आणण्यासाठी चक्क प्रायव्हेट जेट बुक केलं आहे.
कुत्र्यासाठी ती हजारो डॉलर्स खर्च का करत आहे. कुत्र्याला ख्रिसमसआधी घरी आणण्यासाठी मालकिणीचा आटापीटा केला आहे. जो कुत्रा जेटने येत आहे त्याचं नाव आहे मंचकिन. मंचकिन सध्या न्यूझीलंडमध्ये आहे आणि त्याची मालकीण ताश कॉर्बन ऑस्ट्रेलियात आहे.
गेल्या पाच महिन्यांत त्यांची भेटच झालेली नाही. कारण लॉकडाऊनमुळे ती राहात असलेल्या सनशाईन कोस्टवरील विमानसेवा पूर्ण बंद आहे. कॉर्बनचा बॉयफ्रेंड डेव्हिड डायनेस याच्यासोबत मंचकिन न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर आहे.
कोरोनाच्या काही केसेस मिळाल्यानं त्या भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे मंचकिनला परत कसं आणायचं याची चिंता कॉर्बनला सतावत होती. ख्रिसमस साजरा करताना आपला मित्र आणि लाडका कुत्रा सोबत नसेल, ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती.
अखेर तिनं चक्क प्रायव्हेट जेट बुक करून या दोघांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल 32 हजार अमेरिकन डॉलर्स, म्हणजे अंदाजे 24 लाख रुपये खर्च करून जेट बुक करण्याची तयारी कॉर्बननं केली आहे.
हा अवाढव्य खर्च शेअर करण्यासाठी ती काही सहप्रवासीदेखील शोधतेय. मात्र तसं कुणी मिळालं नाही तर सगळा खर्च उचलायचीही तिची तयारी आहे.
ऑस्ट्रेलियात परत आल्यानंतर तिथल्या नियमाप्रमाणे डेव्हिडला 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल, हे खरं मात्र कॉर्बनला आपल्या लाडक्या मंचकिनसोबत ख्रिसमस साजरा करता येईल.