Neelam Gorhe On UBT Shivsena: लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत दोन गट पडले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील प्रमुख नेते, आमदार, खासदार बाहेर पडले. यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना पक्षाचं नाव, चिन्हदेखील दिलं. लोकसभेत कमी जागा मिळालेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने विधानसभेत की कसर भरुन काढली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप करत अनेक नेते एकनाथ शिंदेंकडे येत आहेत. असे असले तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यातील वाद कमी होताना दिसत नाही.
शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. 2 मर्सिडिज दिल्या की एक पद मिळायचं असे त्या म्हणाल्या. दिल्लीत सुरु असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' हा कार्यक्रम झाला. यात झालेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी आधीच्या पक्षावर खळबळजनक आरोप केला.
दरम्यान निलम गोऱ्हेच्या विधानाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
'असे घडलो आम्ही' मुलाखत कार्यक्रमात बोलतना निलम गोऱ्हे म्हणाल्या की, शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. माणसं गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिलं जायचं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायचं, असे त्या यावेळी म्हणाल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी ठाकरेंच्या नेत्यांवरही गंभीर आरोप लावल.ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.