Sushma Andhare on Neelam Gorhe Alligation: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले. 2 मर्सिडिज घेऊन पक्षात प्रवेश दिला जायचा असे निलम गोऱ्हे म्हणाल्या. यानंतर ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, नेते अंबादास दानवे या सर्वांनीच नीलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिलंय. त्यात आता शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही निलम गोऱ्हेंना आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सविस्तर जाणून घेऊया.
नीलम गोऱ्हेंच्या आरोपांनंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट लिहित त्यांना प्रत्युत्तर दिलंय. नीलम गोऱ्हे म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतं..? एखादी कादंबरी, त्यांनी लिहिलेला वैचारिक ग्रंथ, ललित लेखन, कवितासंग्रह, गेला बाजार एखादा चारोळी संग्रह... त्यांची कोणती साहित्यकृती जास्त गाजली...?? असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय. साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांना बोलावले ही साहित्यिकांची अपरिहार्यता आणि अगतिकता ही झाली आहे. शिवाय राजकारणी लोकांनाही स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्याची ही नामी संधी असते. त्यामुळे शासकीय खर्चाने होणाऱ्या साहित्य संमेलनातून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची संधी सोडतील त्या नीलम गोऱ्हे कसल्या..., असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनात गेल्या. तिथे जाऊन साहित्याचे जतन संवर्धन यावर त्यांनी काही बोलावे हे अपेक्षितच नाही कारण आडात असेल तर पोहऱ्यात येईल ना ? मग त्यांनी म्हटले, मी पक्षात असताना , म्हणजे नीलम गोऱ्हे पक्षात असताना खूप आर्थिक व्यवहार चालायचे" मला मोठी गंमत वाटली. मला पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झालीत. नीलम गोरे त्याआधी पंचवीस तीस वर्षे होत्या. अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या. मातोश्रीच्या गेटमधून कुणाला आज प्रवेश द्यायचा कुणाला नाही द्यायचा आज कुणाला भेटायला वेळ मिळेल नाही मिळेल , कुणाची नियुक्ती करायची, सभा संमेलनांना कुठे वेळ द्यायची हे नीलम गोरे ठरवायच्या, असे सुषमा अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय
नीलम गोऱ्हेंच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर स्वाभाविक आहे की नियुक्त्या नेमणुका निवडणुकीची तिकीट या सगळ्या प्रक्रियेत नीलम गोरे होत्या म्हणजे हा सगळा पैसा निलम गोऱ्हे कडे येत असणार? काय केलं असेल त्यांनी एवढ्या पैशाचं? परदेशात एखादा बँक खाता असेलच की... आज त्या बोलल्यानंतर, अनेक लोक अगदी शिंदे किंवा भाजपाकडे गेलेले सुद्धा आवर्जून फोन करून सांगत होते की गोरे वाहिनी कशा पद्धतीने निष्ठावान शिवसैनिकांना मातोश्रीपासून दूर ठेवण्याचे कटाक्षाने प्रयत्न केले, असे गंभीर आरोप त्यांनी नीलम गोऱ्हेंवर केला.
कशा पद्धतीने महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये नीलम गोरे यांचे भाजपची आर्थिक हितसंबंध जुळायचे आणि इथली शिवसेना त्यांनी कशी बापट सेना करून ठेवली. पुण्यातले बिल्डर व्यापारी यांच्याकडे कलेक्शनला जाणारी माणसं यावर पुण्यातले शिवसैनिक अत्यंत चवीने चर्चा करतात, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
अशा नीलम गोऱ्हेंचं नाव घेतलं की मी फार प्रयत्न करते त्यांची एखादी गाजलेली सभा आठवण्याचा. ज्या सभेत त्यांनी अत्यंत घनाघाती भाषण केला असेल. किंवा एखाद प्रचंड मोठा आंदोलन जे आंदोलनात त्यांनी लाट्या काठ्या खाल्या असतील. एखादा मोठा भ्रष्टाचार जो त्यांनी प्राणपणाने लढून बाहेर काढला असेल तर मला असं काहीच आठवत नाही. नीलम गोरे हे नाव उच्चारलं की मला आठवतात.. त्यांनी नेसलेल्या महागड्या लफेदार साड्या.. हिरे मोती माणिक आणि सोन्याचे मॅचिंग नेकलेस, त्याच्यावर तसेच कानातले डूल... साडीला मॅचिंग अशी महागडी ऐटदार पर्स.. तीन-चार मोबाईल, दोन-तीन पीए.. कुणाच्या हातात मोबाईल कोणाच्या हातात डायरी तर कुणाच्या हातात मॅडम साठी दोन-चार हातरुमालाच्या घड्या असतात, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
हडपसरच्या डिस्पेन्सरीला प्रॅक्टिससाठी नीलम गोरे पीएमटीने अर्थात सिटी बसने जा ये करायच्या, असे आज एका माजी आमदाराने फोन करून सांगितल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. पीएमटीने फिरणाऱ्या नीलम गोरे यांच्याकडे आता महागड्या गाड्या आल्या. नीलम गोरे यांचे उद्योगधंदे कोणते माहित आहेत का? मला माहित नाहीत.एवढी आर्थिक सुबत्ता आली कशी? नीलम गोरे तुम्ही अजून कमवा आणि मखलाशा करून अजून पद मिळवा. पंजा पक्षाने तुमचं कर्तृत्व नसताना तुम्हाला मोठं केलंय त्यांच्यावर बोलताना जरा तारतम्य बाळगा. इतकं खोटं लोकांना पचत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.