मुंबई : पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेला कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराबाबत एकीकडे दहशतीचे वातावरण असतानाच दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) लहान मुलांमध्ये होणाऱ्या संसर्गाबाबत एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. डब्ल्यूएचओच्या युरोप कार्यालयाने मंगळवारी सांगितले की 5 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये संक्रमण वेगाने वाढत आहे.
WHO युरोपचे प्रादेशिक संचालक डॉ. हैंस क्लुगे यांनी सांगितले की, लसीकरणामुळे दिलासा मिळाला आहे आणि मृत्यूची संख्या देखील पूर्वीच्या लाटेच्या तुलनेत कमी आहे. पण ते असेही म्हणाले की 53 देशांमध्ये गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या दुप्पट झाली आहे.
ते म्हणाले की, डेल्टा प्रकार (Delta verient) अजूनही पसरत आहे आणि यादरम्यान 21 देशांमध्ये Omicron verient ची 432 प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत. "डेल्टा प्रकार अजूनही युरोप आणि मध्य आशियामध्ये वा़ढत आहेत आणि आम्हाला माहित आहे की ही लस गंभीर आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी आहे. ओमायक्रॉन अधिक गंभीर आहे की नाही हे अद्याप समोर आलेले नाही.'
मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे 2 ते 3 पट वाढली
युरोपातील अनेक देशांमध्ये मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण दोन ते तीन पटीने वाढले असल्याची चिंता क्लुज यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की वृद्ध, आरोग्यसेवा कर्मचारी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांपेक्षा लहान मुलांना कमी गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो. शाळेला सुटी येताच मुले आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या घरी जास्त राहतात, त्यामुळे मुलांमध्ये संसर्ग पसरू शकतो. तसेच, जर त्यांना लसीकरण केले गेले नसेल, तर अशा लोकांना गंभीर आजार होण्याची किंवा मृत्यू होण्याचा धोका 10 पटीने वाढतो. लहान मुलांपासून आजार पसरण्याचा धोका जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
युनायटेड नेशन्सच्या साप्ताहिक अहवालानुसार, सध्या युरोप हा कोरोना महामारीचा केंद्रबिंदू आहे. जगभरातील 61% मृत्यू आणि 70% प्रकरणे येथून येत आहेत.
स्पेनमध्ये 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना लस
स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने वाढत्या संसर्गाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास मान्यता दिली आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की 3.2 दशलक्ष डोस 13 डिसेंबरला येतील आणि त्यानंतर 15 डिसेंबरपासून मुलांचे लसीकरण सुरू होईल.