U19 Womens T20 World Cup 2024 : आयसीसी अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप 2025 (U19 Womens T20 World Cup 2024) सध्या मलेशियामध्ये सुरु असून यात मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात टीम इंडियाच्या महिला संघाने कमाल केली आहे. यजमान मलेशिया संघावर तब्बल 10 विकेट्सने विजय मिळवला असून त्यांनी विजयासाठी दिलेलं टार्गेट अवघ्या 17 बॉलमध्ये पूर्ण केलं आहे. यात भारतीय गोलंदाज वैष्णवी हिने हॅट्रिक विकेट्स घेऊन केवळ 5 धावा देत 5 विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
आयसीसी अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप 2025 सध्या मलेशियामध्ये सुरु असून 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदाच्या अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कपमध्ये तब्बल 16 संघानी सहभाग घेतलाय. मंगळवारी भारत विरुद्ध मलेशिया यांच्यात सामना पार पडला. यात सुरुवातीला भारतीय महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे यजमान मलेशिया संघाला फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 14.3 ओव्हरमध्ये मलेशियाच्या संपूर्ण संघाला ऑल आउट केले. यात वैष्णवी शर्मा हिने 5, आयुषी शुक्लाने 3, ज्योतिषा हिने 1 विकेट्स घेतल्या. भारताच्या घातक गोलंदाजी समोर टीम इंडिया फक्त 31 धावांच करू शकली.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला
टीम इंडियाला विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असताना भारताच्या ओपनिंग फलंदाज गोंगडी तृषा आणि जी कमलिनी या दोघींनी अवघ्या 17 बॉलमध्ये (2.5 ओव्हर) हे टार्गेट पूर्ण केलं. ज्यामुळे टीम इंडियाने मलेशियावर दणदणीत विजय मिळवला. यासह ग्रुप ए मध्ये लागोपाठ दोन विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया टॉपवर पोहोचली आहे. हा सामना कुआलालंपुरच्या बयूमास ओवल मैदानावर खेळवण्यात आला.
भारताची स्टार गोलंदाज वैष्णवी शर्मा हिने 14 ओव्हरमध्ये मलेशियाच्या लागोपाठ 3 विकेट्स घेतल्या. वैष्णवीने 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर नूर ऐन बिंती रोशलान हिला बाद केलं. तर तिसऱ्या बॉलवर नूर इस्मा दानिया आणि वैष्णवीने चौथ्या बॉलवर सिति नजवाची विकेट घेतली. अशा प्रकारे हॅट्रिक घेत वैष्णवी शर्मा अशी कामगिरी करणारी अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड स्पर्धेतील पहिली भारतीय ठरली. वैष्णवीने 4 ओव्हरमध्ये एक मेडन ओव्हर टाकून 5 धावांत 5 विकेट्स घेतल्या.