Basit Ali On Champions Trophy : आगामी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयचं टेन्शन वाढलंय. भारतीय संघ गेल्या 16 वर्षांपासून पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला नाहीये. अशातच आता चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायचा जाणार का? असा सवाल विचारला जातोय. 2023 च्या आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडे असताना बीसीसीआयने आयसीसीला देखील गुडघ्यावर बसवलं होतं. अशातच आता पीसीबी पुन्हा बीसीसीआयच्या ताकदीसमोर झुकणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने मोठं वक्तव्य केलंय.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतात येणार की नाही? हा निर्णय आता पूर्णपणे पंतप्रधान मोदींच्या हातात आहे, जर ते सहमत असतील तर टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करू शकते. तसं झालं नाही तर जय शाह यांना निर्णय घेणं कठीण होईल, असं बासित अलीने म्हटलं आहे. अप्रत्यक्षरित्या, पंतप्रधान मोदी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानला आले तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करू शकतो, असा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी केला.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) प्रमुखांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे , असं परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या आणि पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर देखील सर्वांचं लक्ष आहे.
दरम्यान, भारतीय संघाने 2008 साली पाकिस्तानचा दौरा केला होता. 2008 च्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला होता. मात्र 2023 साली भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. 2023 च्या आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर करावी लागली होती. त्यामुळे आता चॅम्पियन ट्रॉफी देखील हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल, अशीच शक्यता आहे.