Jasprit Bumrah Health Updates : बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पाचव्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला असून यासह 3-1 ने आघाडी घेऊन सीरिज जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलेलं असताना गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाला आपण ही सीरिज जिंकू शकतो असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मैदानात दमदार खेळी करून विजयाचं आव्हान पूर्ण केलं. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये क्वालिफाय केलं आहे.
दक्षिण आफ्रिका यापूर्वीच फायनलमध्ये पोहोचली होती. आता दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार असून हा सामना 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळवला जाईल. सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुखापतग्रस्त झाला होता. आता बुमराहच्या तब्येतीबाबत हेड कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे.
टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने सिडनी टेस्टमध्ये पराभूत झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान गंभीरला बुमराहच्या तब्येतीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा गंभीर म्हणाला, "आता मेडिकल टीम त्याच्याकडे लक्ष देत असून त्याच्या दुखापतीबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही". गंभीरने बुमराहच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. त्याने फक्त एवढंच सांगितलं की, मेडिकल टीम बुमराहवर लक्ष ठेऊन आहे आणि त्याची काळजी घेतेय. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहला खेळ अर्धवट सोडून स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटल गाठावे लागले होते. खेळ संपल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने सांगितले की, बुमराहला बॅक स्पॅज्म आहे. बुमराह दुखापतीने त्रस्त असला तरी तिसऱ्या दिवशी तो फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार आहे. त्यामुळे बुमराहची दुखापत जास्त गंभीर नसावी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याने पूर्णपणे फिट व्हावे अशी प्रार्थना भारतीय क्रिकेट फॅन्स करत आहेत.
हेही वाचा : सामना हरले, सीरिज हरले, WTC फायनलमधून बाहेर पडले पण... भारतासाठी एकमेव गुडन्यूज!
जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024 - 25 मध्ये गोलंदाजीत चांगला परफॉर्मन्स दिला. बुमराहने या सीरिजमध्ये एकूण 151.2 ओव्हर्स टाकले आणि एकूण 32 विकेट्स घेतले. बुमराह सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला.