घोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?

धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय. 

Updated: Feb 6, 2025, 10:33 PM IST
घोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या  मालाची किंमत किती? title=

Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय. कृषी खात्यानं खरेदी केलेल्या वस्तू अंजली दमानिया यांनी ऑनलाईन खरेदी केल्यात आणि त्या वस्तूंच्या किंमती कृषी विभागानं खरेदी केलेल्या किंमतीच्या अनेक पटीनं कमी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे तत्कालीन कृषीमंत्र्यांनी वस्तू खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा केलाय.

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषीविभागात 160 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार अंजली दमानिया यांनी केलाय. बाजारभावातील किंमतीपेक्षा अनेक पटीनं वाढीव किंमत देऊन नॅनो युरिया, नॅनो डीपीएची खत खरेदी करण्यात आल्याचं अंजली दमानिया यांनी आरोप केला होता. मात्र अंजली दमानिया यांचे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले होते.

मात्र आता धनंजय मुंडे यांचा दावा खोटा असल्याचं पुराव्यासह अंजली दमानिया यांनी दाखवून दिलंय. त्यासाठी अंजली दमानिया यांनी एका वेबसाईटवरून नॅनो युरिया, नॅनो डीएपी खरेदी केलीय. त्यात दोन्ही खतांची खरेदी किंमत कृषी विभागानं खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा खूप कमी असल्याचं समोर आलंय.

कृषी मंत्र्यांनी खरेदी केलेला कृषी माल

1. नॅनो युरिया : 220 किंमतीच्या 19,68,408 बॉटल विकत घेतल्या
2. नॅनो डिएपी : 590 रुपयाने 19,57,438 बॉटल विकत घेतल्या.
3. बॅटरी स्प्रे : 3426 रुपयाने 2,36,427 स्प्रे विकत घेतले.
4. मेटाल्डिहाईड  1275 रुपयांनी  1,96,000 किलो विकत घेतलं.
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 1250 रुपयांनी 6 लाख 18 हजार बॅग घेतल्या

अंजली दमानियांच्या दाव्यानुसार क्रुषी मालाची किंमत

1. नॅनो युरिया : 92 रुपये
2. नॅनो DAP : 261 (500 ML) रुपये
3. बॅटरी स्प्रे : 2450 ते 2946 रुपये
4. मेटाल्डिहाईड : 817 रुपये
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 20 बॅग 577 रुपये

कृषी खात्यानं वाढीव दरानं शेतकऱ्यांसाठी खतं खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केला असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

नॅनो युरिआ, नॅनो डीएपीसह इतर 5 वस्तुंची खरेदी 60 ते 70 टक्के वाढीव दरानं करून धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केला आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केलीय.