छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर मोठी कारवाई, यापुढे....

राहुल सोलापूरकर यांना भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे

शिवराज यादव | Updated: Feb 6, 2025, 09:04 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांवर मोठी कारवाई, यापुढे.... title=

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरांवर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. त्यातच राहुल सोलापूरकर यांना भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. राहुल सोलापूरकर यांनी दिलेला राजीनामा भांडारकर संस्थेकडून स्वीकारण्यात आला आहे. 

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसात सलग तिसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. राहुल सोलापूरकरांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनंही करण्यात येत आहेत. सोलापूरकर यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. चौफेर टीकेनंतर राहुल सोलापूरकर यांना पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शिवप्रेमी तसंच मराठा संघटनांनी भांडारकर संस्थेमध्ये शिरत तीव्र आंदोलन केलं होतं. राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करत त्याच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती.

'दिसेल तिथे ठेचलं पाहिजे,' उदयनराजे राहुल सोलापूरकरांवर संतापले, म्हणाले 'अशा लोकांच्या जीभा...'

 

शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त विधानावरून परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याशी संस्थेचा संबंध नसल्याचं स्पष्ट करत राजीनामा संस्थेकडून स्वीकारण्यात आल्याचं संस्थेनं जाहीर केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत... महाराष्ट्राचा आदर्श, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या इतिहासाची धगधगती मशाल.. मात्र राहुल सोलापूरकर यांच्यासारखा एखादा अभिनेता सवंग लोकप्रियतेसाठी महाराजांच्या इतिहासावर जेव्हा ओरखडे ओढतो तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहात नाही.

राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?

पेटारे-बिटारे काहीच नव्हतं.  शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत.  महाराजांनी औरंगजेबाचा वकील, त्याच्या बायकोला लाच दिली होती.  औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र महाराजांनी घेतलं होतं.  त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले.  सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खूण, पुरावे आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती.  मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हंटलं, की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली, की इतिहासाला छेद दिला जातो असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलं होतं.