टीम इंडियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, 4 विकेट्सने जिंकली पहिली वनडे!

IND vs ENG Live Score: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 6, 2025, 09:47 PM IST
टीम इंडियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, 4 विकेट्सने जिंकली पहिली वनडे! title=
टीम इंडिया

IND vs ENG Live Score: शुभमन गिलच्या 87 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाला 47.4 षटकांत केवळ 248 धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 38.4 षटकांत 6 गडी गमावून 251 धावा केल्या.

टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर रोहित आणि जयस्वाल लवकर बाद झाले. रोहितने फक्त 2 धावा केल्या आणि जयस्वालने 15 धावा केल्या. त्यानंतर गिल आणि अय्यर यांनी भारताकडून शानदार फलंदाजी केली. गिलने 96 चेंडूंचा सामना करुन 87 धावा केल्या आणि अय्यरने 36 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या. या सामन्यात अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि त्यानेही आपल्या बॅटने 52 धावा केल्या. इंग्लंडकडून साकिब महमूद आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आर्चर आणि बेथेल यांनीही प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

सॉल्ट आणि डकेट इंग्लंडकडून डावाची सुरुवात झाली. या सामन्यात सॉल्टने 26 चेंडूत 43 धावा केल्या तर डकेटने 29 चेंडूत 32 धावा केल्या. या सामन्यात रूटची बॅट शांत राहिली, तो फक्त 19 धावा करून बाद झाला. सामन्यात ब्रुकने शून्य धावा केल्या. त्यानंतर बटलर आणि बेथेलने संघासाठी अर्धशतके झळकावली. बटलरने 52 आणि बेथेलने 51 धावा केल्या. त्यानंतर, उर्वरित खेळाडू काही खास करू शकले नाहीत आणि ते 248 धावांवर सर्वबाद झाले.

दोघांचे पदार्पण 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी पदार्पण केले. जयस्वालला कर्णधार रोहित शर्माने वनडे कॅप दिली तर मोहम्मद शमीने स्वतःच्या हातांनी हर्षित राणाला एकदिवसीय कॅप दिली.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने शानदार गोलंदाजी केली आणि 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात हर्षित राणाने डकेट, हॅरी ब्रुक आणि लिव्हिंगस्टोनच्या विकेट घेतल्या.

इंग्लंड प्लेइंग 11: बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

टीम इंडिया प्लेइंग 11:  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.