महिलांच्या स्तनांचा संत्रं असा उल्लेख करण्यावरुन दिल्ली मेट्रोचा दणका! युवराज सिंग कनेक्शन चर्चेत

Delhi Metro Action Against Yuvraj Singh Organisation: सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या जाहिरातीवरुन नवीन वादाला तोंड फुटल्यानंतर दिल्ली मेट्रोने घेतला मोठा निर्णय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 25, 2024, 10:26 AM IST
महिलांच्या स्तनांचा संत्रं असा उल्लेख करण्यावरुन दिल्ली मेट्रोचा दणका! युवराज सिंग कनेक्शन चर्चेत title=
दिल्ली मेट्रो प्रशासनाने जारी केलं पत्रक (प्रातिनिधिक फोटो)

Delhi Metro Action Against Yuvraj Singh Organisation: सोशल मीडियावरुन जोरदार टीका झाल्यानंतर दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्परेशन म्हणजेच डीएमआरसीने स्तनांच्या कर्करोगासंदर्भातील वादग्रस्त जाहिरात हटवण्यात आल्याची घोषणा केली आहे. सदर जाहिरातीमधील फोटो तसेच संदेश हा योग्य पद्धतीने मांडण्यात आला नसल्याने हा निर्णय घेतला जात असल्याचं डीएमआरसीने स्पष्ट केलं आहे. स्तनांच्या कर्करोगासंदर्भातील जनजागृतीसाठी दिल्ली मेट्रोमध्ये लावण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेल्या मजकुरात स्तनांचा संत्रा असा उल्लेख केलेला. "तुमच्या संत्रा तपासा" असा उल्लेख या छापील जाहिरातीच्या तळाशी होता. त्यावरुनच या जाहिराती असंवेदनशील असल्याचा आरोप करण्यात आलेला. 

जारी केलं पत्रक

डीएमआरसीने यासंदर्भातील एक पत्रकच जारी केलं आहे. "हे पत्र स्तनांच्या कर्करोगासंदर्भातील जाहिरातीच्या फोटोबद्दल आहे. ही जाहिरात दिल्ली मेट्रोच्या ट्रेनमध्ये झळकली होती. डीएमआरसीला या जाहिरातीमधील मजकूर अयोग्य वाटल्याने तातडीने या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे," असं डीएमआरसीने पत्रात म्हटलं आहे. सदर वादग्रस्त जाहिरात केवळ एकाच ट्रेनमध्ये झळकल्याचा दावा डीएमआरसीने केला आहे. 23 ऑक्टोबर रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास ही वादग्रस्त जाहिरात दिल्ली मेट्रोतून हटवण्यात आल्याचं डीएमआरसीने जाहीर केलं आहे.

प्रकरण काय?

कॅन्सरवर मात करुन अनेकांचं प्रेरणास्थान ठरलेला क्रिकेटपटू युवराज सिंगची यू वी कॅन (YouWeCan) नावाची ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी सेवाभावी संस्था आहे. याच संस्थेच्या जाहिरातीमुळे वाद झाला आहे. स्तनांच्या कर्करोगासंदर्भात म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरच्या जाहिरातीमध्ये महिलांच्या स्तनांसाठी चक्क 'संत्री' हा शब्द वापरण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी ही जाहिरात असंवेदनशील असून महिलांचा अपमान करणारी असल्याचं म्हटलं आहे. या संस्थेच्या ताज्या जाहीरातीमध्ये एक महिला गुलाबी रंगाची साडी नेसून बसमध्ये उभी असल्याचं दिसत आहे. तिच्या समोर एका टोपलीमध्ये संत्री आहेत. या महिलेनेही तिच्या हातात दोन संत्री पकडली असून तिच्या समोर सीटवर बसलेल्या वयस्कर महिला तिच्याकडे पाहताना दिसत आहेत. या फोटो खालील मजकुरामध्ये, "Check your oranges once a month" म्हणजेच 'महिन्यातून एकदा तुमची संत्री तपासून घ्या' असं वाक्य लिहिलेलं आहे. 'लवकर निदान झालं तर जीव वाचू शकतो,' अशी ओळ त्याखाली लिहिलेली आहे. अनेकांनी ही जाहिरात फारच लज्जास्पद असल्याचं म्हणत आक्षेप नोंदवला आहे.

असं या पुढे होणार नाही

"लोक भावनेचा आदर करण्याचा डीएमआरसीचा प्रयत्न असतो. योग्य मजकूर नसलेल्या कोणत्याही मोहिमेला, जाहिरातीला किंवा प्रक्रियेला डीएमआरसी समर्थन करत नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या जाहिरातींसंदर्भातही डीएमआरसी संवेदनशील आहे. अशाप्रकारच्या चुकीच्या जाहिराती दिल्ली मेट्रोच्या आवारात लागणार नाही याची काळजी यापुढे घेतली जाईल," असंही डीएमआरसीने पत्रकामध्ये म्हटलं आहे.