मुंबई: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. एकीकडे IPLमध्ये देखील कोरोना शिरला आहे. कोलकाताचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एका खेळाडूला बीसीसीआयने पगार न दिल्याने कोरोनावर उपचार करण्यासाठी हातात पैसे नसल्यानं चिंता व्यक्त केली आहे.
21 वर्षाचा वेगवान गोलंदाज प्रशांत सिंह बिहार अंडर -23 संघाचा सदस्य आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मागील 2 वर्षांपासून या खेळाडूला त्याचा पगार दिलेला नाही. प्रशांतच्या मोठ्या भावाला कोरोना झाला आहे. आईची तब्येतही बरी नसते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत या खेळाडूला पैशांची नितांत गरज आहे. पगारही दिला नाही आणि आता हातात खर्च करायला पैसेही नसल्यानं खेळाडूनं चिंता व्यक्त केली आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने बिहारच्या खेळाडूंचे पैसे दिले नाहीत. अंडर 23 अंडर 19 आणि सीनियर टीम 2019-20 आणि 2020-21 च्या पगाराची खेळाडू अजूनही आतूरतेनं वाट पाहात आहेत.
आयपीएलमध्ये देखील कोरोना घुसला आहे. कोलकाता संघाचे 2 खेळाडू पॉझिटिव्ह आले असून त्यांना आयसोलेट करण्यात आलं आहे. इतर खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात येणार असून आज होणारा बंगळुरू विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला आहे. देशातही कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जो-तो आपआपल्या परिनं मदतीचा हात पुढे करत आहे.