Elephanta Caves Gharapuri island : मुंबई शहर हे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. सर्व सोई सुविधा आणि अलिशाल जीवनशैली असलेल्या मुंबई शहरापासून 6 ते 7 मैल अंतरावर भर समुद्रात 3 गावं आहेत इथं राहणाऱ्या लोकांना छोटी वस्तू खरेदी करायची असली तरी थेट मुंबईला यावे लागते. विशेष म्हणजे ही गावं ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. देश विदेशातून पर्यटक येथे येतात. मात्र, या 3 गावातील लोकांना मात्र, प्रवासासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. जाणून घेऊया महाराष्ट्रातील 3 अनोख्या गावांतील लोकांचे राहणीमान आहे तरी कसे.
महाराष्ट्रातील 3 अनोखी गावं मुंबईजवळच्या एलिफंटा बेटावर आहेत. एलिफंटा हे भर समुद्रात असलेलं मुंबईजवळचं सर्वात फेमस पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावरील डोंगरात एलिफंटा लेणीचे कोरण्यात आली आहे. या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेल्या या लेणी नवव्या ते तेराव्या शतकाच्या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत. 1987 साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. यावरुनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले.
1987 मध्ये युनेस्कोने एलिफंटा बेटाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. एलिफंटा बेटाला दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. मात्र, एलिफंटा बेट प्रसिद्ध असले तरी या बेटावर असलेल्या तीन गावांमधील लोक प्राथमिक सोई सुविधांपासून वंचित आहेत. बेटावरील तीन गावांमध्ये जवळपास 1200 लोक राहतात. शेटबंदर, मोराबंदर आणि राजबंदर अशी तीन गाव एलिफंटा बेटावर आहेत. मात्र, या गावांमध्ये शाळा नाही, वैद्यकीय सोई सुविधा नाहीत. पर्यटन हे इथल्या लोकांच्या उपजिवीकेचे प्रमुख माध्यम आहे. या गावांमध्ये जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही.