पुरोगामी भुजबळांची वाटचाल धार्मिकतेकडे?; भय्याजी जोशींकडून रामभक्त उपाधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी छगन भुजबळ यांना चक्क रामभक्ताची उपमा दिलीये.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 12, 2025, 08:31 PM IST
पुरोगामी भुजबळांची वाटचाल धार्मिकतेकडे?; भय्याजी जोशींकडून रामभक्त उपाधी title=

राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या चर्चेमध्ये भर पडली आहे ती आजच्या सरकार्यवाह भय्याजी जोशी आणि छगन भुजबळ यांच्या एकत्रित उपस्थितीची. मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी एकत्रित आल्याने पुरोगामी भुजबळ यांची वाटचाल धार्मिकतेकडे होत आहे का? ही चर्चा रंगलीय.

छगन भुजबळांना रामभक्ताची उपाधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी छगन भुजबळ यांना चक्क रामभक्ताची उपमा दिलीये. छगन भुजबळ म्हणजे ओबीसी नेते, छगन भुजबळ म्हणजे शाहू-फुले-आंबेडकरवादी नेते अशी छगन भुजबळ यांची प्रतिमा आहे. पण आता भय्यूजी जोशींनी त्यांना रामभक्त अशी नवी उपाधी बहाल केलीय. नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वरमधील राम मंदिराच्या जोर्णोद्धाराच्या कार्यक्रामत छगन भुजबळ आणि भय्याजी जोशी एकाच मंचावर आले होते. त्यावेळी जोशी यांनी हा उल्लेख केलाय. यावेळी छगन भुजबळ आणि भय्याजी जोशी यांनी श्रीरामाची एकत्रित आरतीही केली. या सोहळ्यासाठी जी बॅनरबाजीही केली त्या बॅनर्सच्या भगव्या रंगाचीही चर्चा होती.

पुरोगामी भुजबळांची वाटचाल धार्मिकतेकडे?

राष्ट्रवादीने मंत्रिपदापासून दूर ठेवल्यानंतर छगन भुजबळ यांची भाजपशी जवळीक वाढली होती. अमित शाहांच्या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती. छगन भुजबळांच्या बॅनरवर अजित पवारांऐवजी मोदी शाहांचा फोटो लावल्यानंतर याची अधिक चर्चा झाली. त्यामुळे छगन भुजबळ पुरोगामी वाटेवरून आता धार्मिकतेच्या मार्गाकडे मार्गक्रमण करत आहे हेच दिसून येतंय. 

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची पुरोगामी विचारांचे नेते म्हणून ओळख आहे.  शाळांमध्ये सरस्वती आणि शारदादेवीचा फोटो लावण्यावरून छगन भुजबळांनी केलेल्या एका वक्तव्याची आता चर्चा सुरू झालीय. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यांची भाजपशी वाढलेली जवळीक सर्वांनाच माहिताय. मात्र आता भुजबळांची संघाशीही जवळीक वाढताना दिसतेय. त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये व्हाया आरएसएस येताहेत का याची चर्चा सुरू झालीय.