...जेव्हा सलमानने शुटिंग सुरु असणाऱ्या चित्रपटातून गोविंदाला काढलं, मध्यरात्री 3 वाजता फोन; म्हणाला 'तू आता...'; ठरला सुपरहिट

Bollywood Kissa: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 'जुडवा' चित्रपट अशावेळी मिळाला होता, जेव्हा त्याचं करिअर फार चांगलं जात नव्हतं. पण या चित्रपटासाठी आधी गोविंदा (Govinda) आणि करिश्माला कास्ट करण्यात आलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Feb 12, 2025, 07:18 PM IST
...जेव्हा सलमानने शुटिंग सुरु असणाऱ्या चित्रपटातून गोविंदाला काढलं, मध्यरात्री 3 वाजता फोन; म्हणाला 'तू आता...'; ठरला सुपरहिट title=

Bollywood Kissa: सलमान खान, करिश्मा आणि रंभा यांचा 1997 मध्ये रिलीज झालेला 'जुडवा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला होता. या चित्रपटाची गाणी तर आजही चाहते तितकीच मजा घेत ऐकतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटाचा खरा हिरो गोविंदा होता. त्याने या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि निर्माते नंदू तोलानी होते. पण एक दिवस सलमान खानने त्याला फोन केला आणि आपल्यासाठी हा चित्रपट सोडण्याची विनंती केली. त्यानंतर गोविंदाही चित्रपटापासून दूर झाला. स्वत: गोविंदाने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. 

झालं असं की, सलमान खान सतत फ्लॉप चित्रपटांमुळे त्रस्त होता आणि करिअरमध्ये अनेक अडथळे येत होता. त्याला एका हिट चित्रपटाची फार गरज होती. यादरम्यान सलमान खानला डेव्हिड धवन गोंविदासह 'जुडवा' नावाचा एक चित्रपट करत असल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याने थेट गोविंदाला फोन करुन आपल्यासाठी चित्रपट सोडण्याची विनंती केली. त्यावेळी गोविंदाचं करिअर जबरदस्त सुरु असल्याने त्याला हा चित्रपट सोडणं फार काही कठीण गेलं नाही. सलमान खान चित्रपटात आल्यानंतर नंदू तोलानी यांच्या जागी साजिद नाडियाडवालाने निर्मात्याची जागा घेतली. 

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने सांगितलं होतं की, 1997 मध्ये रिलीज झालेला जुडवा चित्रपट आधी त्याला ऑफर झाला होता. त्यावेळी माझं करिअर टॉपला होतं. मी बनारसी बाबू चित्रपटाचं शुटिंग करत होतो. त्याचवेळी जुडवासाठीही काम करत होते. या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना एकदा मध्यरात्री 2-3 वाजता मला सलमान खानने फोन केला आणि विचारलं. ''चिची भैय्या, अजून किती हिट देणार आहेस?.

'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'

 

"हे ऐकल्यानंतर मी विचारलं, काय झालं? त्यावर तो म्हणाला, तू ज्या जुडवा चित्रपटासाठी शुटिंग करत आहेस त्या प्रोजेक्टमधून बाजूला हो आणि मला दे. नंतर सलमानसाठी मी ज्या चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं ते थांबवलं," असं गोविंदाने सांगितलं होतं.

7 फेब्रुवारी 1997 रोजी जुडवा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 6 कोटी 25 लाखात तयार झालेल्या या चित्रपटाने 13 कोटी 14 लाखांची कमाई केली होती. हा चित्रपट मोठा हिट ठरला. जर व्हीसीआर नसते तर जुडवा हा चित्रपट जास्त हिट झाला असता असंही म्हटलं जातं. जुडवा 1997 मधील दहावा सर्वात यशस्वी चित्रपट होता. त्यावर्षी पहिल्या क्रमांकावर 'बॉर्डर', दुसऱ्यावर 'दिल तो पागल है' होता. इश्क तिसऱ्या स्थानावर होता. जुडवापेक्षा एक पाऊल वर, म्हणजेच नवव्या स्थानावर, 'दीवाना मस्ताना' होता. 11 व्या स्थानावर, 'चाची 420' होता. 12 व्या स्थानावर, 'येस बॉस' होता. 

जुडवामध्ये रंभाच्या आधी ममता कुलकर्णीला ऑफर देण्यात आली होती. पण ममता कुलकर्णीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि रंभाला भूमिका मिळाली. पण चित्रपटातील रंभाचे संवाद तब्बूने डब केले होते. 

जुडवा हा 1994 मधील तेलुगू चित्रपट 'हॅलो ब्रदर'चा रिमेक होता. या चित्रपटात नागार्जुन मुख्य भूमिकेत होता. आणि हॅलो ब्रदर हा चित्रपट जॅकी चॅनच्या ट्विन ड्रॅगन्स चित्रपटाचा रिमेक देखील होता. योगायोग म्हणजे, सलमान खानने 'हॅलो ब्रदर' नावाच्या चित्रपटातही काम केलं आहे. हा देखील योगायोग आहे. नागार्जुनचा 'हॅलो ब्रदर' नंतर हिंदीमध्ये डब करून प्रदर्शित झाला तेव्हा त्याचं नान 'करण-अर्जुन' असं ठेवण्यात आलं होतं.