एखाद्या ग्राहकाला फसवलं, लुटलं की आपण ग्राहक मंचाकडे दाद मागतो. पण नाशकात ग्राहक मंचात एक वेगळीच तक्रार आली. मांत्रिकाने करणी बाधा उतरवतो असं सांगितलं, मात्र बाधा गेली नाही अशी तक्रार एका महिलेने केली आहे. विशेष म्हणजे या अंधश्रद्धेची ग्राहक मंचाने दखल घेत मांत्रिकाला दंड ठोठावला आहे. या प्रकाराने सगळेच अचंबित झाले आहेत.
नाशकातील एका प्रकाराने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. घरात सातत्याने आजारपण, परिस्थिती बिकट उपचार करूनही उपयोग होत नसल्याने नाशकातील एका महिलेने कानपूरच्या एका मांत्रिकाला संपर्क साधला. एका दिवसाच्या पूजेने सर्वकाही समस्या दूर होतील असे आश्वासन दिले. यासाठी अडीच लाख रुपये खर्च सांगितला. या महिलेने या सर्व पूजा करूनही हवा तसा फरक पडला नाही म्हणून तिने थेट ग्राहक मंच गाठलं.
फसवल्याचे पुरावे म्हणून या महिलेने मांत्रिकाचे युट्युबवरचे दावे, जाहिरात आणि पैसे घेतल्याची पावती सादर केली. त्यामुळे तिला ब्लॅक मॅजिक ऍक्ट नुसार न्याय मिळाला. ग्राहक मंचाने मांत्रिकाला भरपाई म्हणून 50 हजाराचा दंड ठोठावला..
अशा पूजाविधी म्हणजे केवळ फसवाफसवीचे प्रकार आहेतय अशा मांत्रिकांवर कारवाईची गरज असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं म्हटलं आहे.
हा सगळा प्रकार म्हणजे चोराने चोरी करून पोलिसांकडे काहीच मिळालं नाही अशी तक्रार करावी असाच आहे. खरतंर अशा मांत्रिकांवर बंदी असतानाही छुपा व्यवसाय केला जातो. आणि मांत्रिकामुळे फरक पडला नाही ग्राहक मंचाने मांत्रिकाला दंड ठोठावला. या विचित्र प्रकाराने महिलेला न्याय मिळाला. पण या निकालामुळे अंधश्रद्देला अप्रत्यक्षपणे खतपाणी घातल्याचं दिसत आहे. राज्यातील हि पहिलीच घटना असून सध्या याची चर्चा सुरू आहे.