नवी दिल्ली : इनकम टॅक्स विभागाकडून ऑनलाईन टॅक्स रिटर्न भरण्याचं काम अधिक सुलभ आणि सुटसुटीत करण्यात आलं आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे बंगळुरूला पाठवण्याची आता गरज नाही. या त्रासातून सुटका करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने सोमवारी इ-फायलिंग प्रणाली सुरू केली आहे.
या प्रणालीद्वारे पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना तसेच प्राप्तीकर विभागाकडून परताव्याचा कोणताही दावा न करणाऱ्या करदात्यांना बंगळुरूला कागदपत्रे न पाठविता केवळ ऑनलाईन रिटर्न भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून 'ऑनलाइन टॅक्स रिटर्न प्रक्रिया' अधिक सुलभ होण्यास मदत झाली आहे.
प्राप्तिकर विभागाने सोमवारी आपली महत्वाकांक्षी टवन टाइम पासवर्ड' (OTP)आधारित ई-फाइलिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे रिटर्न भरणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. या प्रणालीद्वारे 'ई-फायलिंग व्हेरिफिकेशन सिस्टीम' सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) नियमानुसार वार्षिक पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि कोणत्याही परताव्यासाठी (रिफंड) दावा न करणाऱ्या करदात्यांना 'इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड'च्या (ईव्हिसी) माध्यमातून 'ई-फायलिंग' आणि कर विवरणपत्रक (आयटीआर) आयकर विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने पाठविणे आवश्यक आहे. या 'ई-फायलिंग' सुविधा नोंदणीकृत करण्यासाठी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडीसह आधार क्रमांकाची गरज पडणार आहे.
या नव्या प्रणालीमुळे बंगळुरू येथील आयटी सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला (सीपीसी) पेपर ऍक्नालेज्मेंट (पोच पावती) पाठवण्याची गरज भासणार नाही. शिवाय दिलेल्या इतर पर्यायाद्वारे म्हणजे ज्यांच्याकडे इंटरनेट बॅंकिंग असेल असे करदाते आयटीआरचे 'इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन' करू शकणार आहे.
'ही सुविधा आता इंटरनेट बॅंकिंग वेबसाइटवर उपलब्ध होईल. करदात्यांना लॉगिन पासवर्ड, बॅंकिंग आयडी आणि ट्रॅन्झॅक्शन पासवर्ड वापरुन या सुविधेचा वापर करता येऊ शकेल' असे सीबीडीटीच्या सुधारित नियमावलीत सांगितले आहे.
एकदा करदात्याने बॅंकिंग पोर्टल वर लॉग इन केले की, प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेब पोर्टलवरुन करदात्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर 'इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड' (ईव्हिसी) पाठवला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.