Virat Kohli : शनिवारी मुंबई बीसीसीआय तर्फे वार्षिक नमन अवॉर्ड्स 2025 (BCCI Namaan Awards 2025) चे आयोजन करण्यात आले होते. यात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा सह पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडू उपस्थित होते. यावेळी माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरला बीसीसीआयने कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच कार्यक्रमात 2023-24 हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तर माजी दिग्गज गोलंदाज रविचंद्रन अश्विन यालाही विशेष सन्मान देण्यात आला. मात्र बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्याला विराट कोहलीने मात्र दांडी मारली. ज्याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा देखील झाली, आता यामागचं मोठं कारण समोर आलं आहे.
बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये सचिन, रोहित, गंभीर, सूर्यकुमार, अश्विन, स्मृती मंधाना यासारखे अनेक क्रिकेटर्स उपस्थित होते. परंतु यात विराट कोहलीच्या अनुपस्थिती सर्वांनाच जाणवत होती. भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये देखील याबाबत चर्चा होऊ लागली. मात्र आता यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. विराट कोहली जवळपास 13 वर्षांनी रणजी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान रंगलेल्या या सामन्यात विराट कोहली दिल्ली संघाकडून रेल्वे विरोधात खेळत होता. शनिवारी दिल्लीने रेल्वे संघाचा 1 डाव आणि 19 धावांनी पराभव केला. दिल्ली विरुद्ध रेल्वे रणजी सामना संपल्यावर अरुण जेटली स्टेडियमवर विराटचा सत्कार करण्यात आला. तर त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईत बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा होता. त्यामुळे विराट मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा : टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन्स! फक्त 68 बॉल खेळून जिंकला वर्ल्ड कप, विजेत्या ट्रॉफीवर कोरल नावं
बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना ट्रॉफी तसेच रोख बक्षिसे, 50,000 ते 15 लाखांपर्यंत देण्यात आली. हा पुरस्कार केवळ खेळाडूंचाच सन्मान करत नाही तर तरुण आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंना एक मोठा व्यासपीठही देतो. याशिवाय बीसीसीआय नमन पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंच आणि इतर अधिकाऱ्यांनाही गौरविण्यात आले. या भव्य कार्यक्रमाने भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांना एका व्यासपीठावर एकत्र आणले आणि खेळाप्रती त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला सलाम केला.
विराट कोहली 2012 नंतर पहिल्यांदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु विराट रेल्वे विरुद्ध फलंदाजीसाठी उतरल्यावर समाधानकारक धावा करू शकला नाही आणि युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड झाला. विराटने 15 बॉल खेळून 6 धावा केल्या. दरम्यान त्याने एक चौकार लगावला. विराटला बाद केल्यावर गोलंदाज हिमांशु आणि त्याच्या संघाने आक्रमक सेलिब्रेशन केले. विराट कोहलीने आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये एकूण 23 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये 50.77 च्या सरासरीने 1574 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 शतक देखील लगावली आहेत.