Mumbai News Today: मुंबईतील वायू प्रदूषण हा मुद्दा आता गंभीर बनत चालला आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपायययोजना हाती घेतल्या आहेत. त्यातीलच एक उपाय म्हणजे वायुप्रदूषण टाळण्यासाठी लाकूड आणि कोळशाचा वापर करून चालवण्यात येणाऱ्या बेकऱ्यांच्या भट्टया बंद करण्याचा तसेच भट्ट्यांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्याचा फटका बेकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. (Coal Tandoor Furnace Ban In Mumbai)
कोळसा भट्टीवर बंदी घातल्यास वडापावांसाठी लागणाऱ्या पावांचा तुटवडा होऊ शकतो. कारण मुंबईतील अनेक बेकऱ्या, इराणी कॅफे हे ५० ते १०० वर्षे जुने आहेत. या बेकऱ्यांमधील भट्टया या लाकडाचा वापर करून पेटवता येतील, अशा विशिष्ट पद्धतीने तयार केल्या आहेत. बेकऱ्यांमध्ये निर्माण होणारा धूर बाहेर सोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार चिमण्याही बसवल्या आहेत. मात्र, आता लाकूड आणि कोळशाच्या भट्टीवर बंदी घातल्यास मुंबईतील अनेक बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकूड आणि कोळशाचा वापर केला जातो. भट्टयांमध्ये बदल करण्यासाठी किमान दोन वर्षे आवश्यक आहेत. अल्पावधीत बेकऱ्यांमध्ये पर्यायी इंधनाचा अवलंब करण्यासाठी बदल करणे शक्य आणि व्यवहार्य नाही, असं बेकरी मालकांचे म्हणणे आहे.
लाकूड आणि कोळसा वापरून त्यावर चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करणे अतिशय अवघड असून त्याकरिता कठोर कारवाई केल्यास बेकरी उद्योग संकटात येईल, तसेच बदल करण्यासाठी महिनाभर बेकरी बंद ठेवावी लागणार असल्याची भीती बेकरी व्यावसायिकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. जर असे झाल्यास मुंबईत पावाचे उत्पादन घटण्याची चिंता व्यक्त होत आहे.
ग्लोबल वार्मिंगमुळं वायू प्रदुषणाचा फटका मुंबईलाही बसला आहे. शहरातील वायूप्रदूषण कमी व्हावेत यासाठी कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्या बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. पालिकेने 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करुन इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. महापालिकेने आत्तापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट हॉटेलला पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे.