When is the Right Time to Have Cataract Surgery: मोतीबिंदू हा एक सर्वसामान्यपणे आढळणारा दृष्टीदोष आहे. विशेषतः, वृद्धांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळून येते. हा आजार हळुहळू वाढतो आणि डोळ्यांमधील नैसर्गिक भिंग पांढुरके होते आणि दैनंदिन कामे करणे कठीण जाऊ लागते. यात दूरचे अस्पष्ट दिसू लागते, रात्री गाडी चालवताना उजेडामुळे त्रास होणे, रंग फिकट दिसणे, वाचन करणे कठीण होणे, तीव्र प्रकाश सहन न होणे आणि कधी कधी दोन प्रतिमा दिसणे अशा समस्या उद्भवतात. मोतीबिंदूवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकच उपाय असला तरी शस्त्रक्रिया होईपर्यंत जीवनशैलीत काही बदल केले तर जीवनमानाच्या दर्जात सुधारणा होऊ शकेल. याबद्दल अधिक जाणून घेऊयात डॉ अग्रवालस् डोळ्यांचे हॉस्पिटल, हडपसरच्या सल्लागार नेत्रतज्ञ डॉ. वैशाली माथुर यांच्याकडून...
वाचन किंवा जवळची कामे करताना खोलीत पुरेसा प्रकाश असावा. थेट तीव्र प्रकाश टाळा. घरात खिडक्यांना पडदे लावा आणि बाहेर जाताना सनग्लासेसचा वापर करा.
रात्री गाडी चालवणे शक्यतो टाळा. कारण ते घातक ठरू शकते. त्याऐवजी टॅक्सी किंवा सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर करा. रोजच्या ड्रायव्हिंगचा वेळ कमी करा.
मोबाइल फोन आणि लॅपटॉपवर मोठा फॉन्ट ठेवा आणि आकाराने मोठी अक्षरे असलेली पुस्तके वाचा, जेणेकरून डोळ्यांवर ताण येणार नाही. फॉन्ट लहान असेल तर भिंगाचा वापर करा.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी अँटिऑक्सिडंट आणि गाजर, पालेभाज्या, मासे, सिट्रस फळे असा आहार घ्या.
मधुमेह आणि हायपरटेन्शनवर नियंत्रण ठेवा. कारण त्यामुळे मोतीबिंदूची समस्या वेगाने गंभीर स्वरूप धारण करू शकते.
वरील लक्षणे जाणवू लागल्यास मोतीबिंदूची शस्त्रक्रिया हा योग्य पर्याय ठरू शकतो. कारण जीवनशैलीत बदल करूनही मोतीबिंदूसह जगणे त्रासदायक ठरू शकते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा स्पष्ट दिसू लागते आणि या शस्त्रक्रियेनंतर कोणताही मोठा त्रास होत नाही. योग्य इन्ट्राओक्युलर लेन्स निवडल्यास चष्म्याची गरजही कायमची दूर होऊ शकते. दृष्टीतील हे बदल जाणवत असतील, तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण शस्त्रक्रिया वेळेत केली तर दृष्टी स्पष्ट होते.