रस्ते बांधकाम कंपनीकडून महाराष्ट्राची लूट? सरकारला कोट्यवधी रुपयांचा गंडा? हजारो ब्रास गौण खनिजाची चोरी

मध्य प्रदेशातल्या एका रस्ते बांधकाम आणि टोल कंपनीनं महाराष्ट्र सरकारला कोट्यवधी रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

शिवराज यादव | Updated: Feb 21, 2025, 06:16 PM IST
रस्ते बांधकाम कंपनीकडून महाराष्ट्राची लूट? सरकारला कोट्यवधी रुपयांचा गंडा? हजारो ब्रास गौण खनिजाची चोरी

विशाल करोळेसह, ज्ञानेश सावंत, झी 24 तास

मध्य प्रदेशातल्या एका रस्ते बांधकाम आणि टोल कंपनीनं महाराष्ट्र सरकारला कोट्यवधी रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रात अनेक टोल आणि रस्ते बांधणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं अनेक ठिकाणी बेकायदा उत्खनन केलं आहे. परवानगीपेक्षा जास्तीचं गौण खनीज उत्खनन करुन कंपनीनं डोंगरच्या डोंगर खोदून टाकले आहेत. झी 24 तासच्या एसआयटीचा कंपनीच्या खाबुगिरीवर हा स्पेशल रिपोर्ट पाहा. 

दगड आणि मुरुमाचं एवढं खोदकाम केलंय की त्या ठिकाणी एखादं तळं होईल. कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीनं सरकारी कंत्राट मिळवलंच शिवाय गौणखनिजाचं खोदकाम करुन महाराष्ट्राची दिवसाढवळ्या लूट केली आहे. गौण खनिजाची ही लूट केलीय पांढरपेशा कंत्राटदारानं... सरकारी कंत्राटं मिळवायची आणि सरकारी मालकीच्या जमिनीतलं गौण खनिज पळवायचं असा दुहेरी लुटीचा धंदा सुरु केला आहे. झी 24 तासच्या एसआयटीकडून कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराच्या गौण खनिज लुटीची कुंडली मांडण्यात येणार आहे. कल्याण टोलवेजनं कोट्यवधी रुपयांच्या केलेल्या गौणखनीज चोरीचा पदार्फाश या स्पेशल रिपोर्टमध्ये होणार आहे. 

कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या मध्यप्रदेशातल्या कंपनीने छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीला जोडणाऱ्या बिडकीन-करमाड रस्त्याचं कंत्राट मिळवलं. रस्त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या भरावासाठी माती आणि मुरुम लागणार होता. यासाठी मौजे जोडवाडी या गावातल्या गट क्रमांक 154 मध्ये मुरुम आणि माती उत्खननाची परवानगी तहसीलदारांकडं मागण्यात आली. तहसीलदारांनी 22 नोव्हेंबर 2019 ला  9 हजार 225 ब्रास मुरुम-माती उत्खननाची परवानगी दिली. यासाठी कल्याण टोलवेजनं 37 लाख रुपयांची रॉयल्टी भरली. इथपर्यंत सगळं अगदी कायदेशीर चालल्याचं भासवण्यात येत होतं. पण खरा लुटीचा खेळ इथूनच सुरु झाला. गौण खनिज उत्खननाची परवानगी 9 हजार 225 ब्रासची असताना प्रत्यक्षात हजारो ब्रास माती या भागातून खणण्यात आली. परवानगीच्या चारपट गौणखनिज खोदण्यात आलं. डोंगरच्या डोंगर कोरण्यात आले. ही लूट दिवसाढळ्या सुरु होती.

कल्याण टोलवेज कंपनीला कुणी आडकाठी करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या हातात उत्खननाचा परवाना होता. त्यामुळं जे उत्खनन सुरु आहे ते सगळं उत्खनन अधिकृत आहे असं भासवण्यात येत होतं. याचा पुरावा म्हणून गौण खनिज उत्खननाची रॉयल्टी भरल्याचं पत्र कंपनीकडं होतं.

प्रत्यक्षात ही दिशाभूल होती. कंपनीला फक्त 9 हजार 225 ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी होती. आणि कंपनीनं परवानगीच्या चारपट म्हणजेच तब्बल 45 हजार 993 ब्रास गौण खनिजाचं उत्खनन केलं होतं. याबाबत तक्रार मिळताच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालयानं केलेल्या उत्खननाची पाहणी केली. या उत्खननाच्या मोजणीसाठी ईटीएस म्हणजे ईलेक्ट्रॉनिक टोटल मशीनचा वापर करण्यात आला. या सगळ्या मोजणीचा अहवाल 19ऑक्टोबर 2021 साली तयार करण्यात आला. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली.

गौण खनिज उत्खननातून 'कल्याण' 

- मौजे जोडवाडीतील गट क्रमांक 154मधून तब्बल 45 हजार 993 ब्रास मातीचं उत्खनन झालं
- कल्याण टोलवेजला अवघी 9 हजार 225 ब्रास माती उत्खननाची परवानगी होती
- कल्याण टोलवेजनं केलेल्या जादा उत्खननाची माहिती लपवून ठेवली
- महसूल खात्याची फसवणूक करुन सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली 

कल्याण टोलवेज कंपनीनं दिवसाढवळ्या सरकारची लूट केली आहे. सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे. जेव्हा ही बाब सरकारच्या लक्षात आली तेव्हा कंपनी लपवाछपवी करत होती. गौण खनिजाची लूट करुन उजळमाथ्यानं फिरणाऱ्या या ठेकेदार कंपनीनं स्वतःचं मात्र कोटकल्याण करुन घेतलं आहे.

या संदर्भात झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत? 
1) परवानगीपेक्षा जास्त उत्खननाची बाब प्रशासनाच्या लक्षात का आली नाही?
2) चौपट उत्खनन होत असताना प्रशासनानं डोळेझाक केली का?
3) कायद्याला धाब्यावर बसवलं जात असताना ठेकेदाराला कोणाचा आशीर्वाद होता का?
4) थातूरमातूर नोटीस बजावून ठेकेदाराला अभय दिलं जात होतं का?

झी 24 तासच्या एसआयटीनं कल्याण टोलवेज कंपनीला वारंवार ईमेल आणि फोनद्वारे संपर्क साधला. पण त्यांच्याकडून झी 24 तासच्या एसआयटीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.