न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या घोटाळाप्रकरणी पोलिसांचा मोठा निर्णय; जनरल मॅनेजर हितेश मेहताला....

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक करण्यात आली आहे. 

शिवराज यादव | Updated: Feb 19, 2025, 08:51 PM IST
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या घोटाळाप्रकरणी पोलिसांचा मोठा निर्णय; जनरल मॅनेजर हितेश मेहताला....

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक करण्यात आली आहे. मात्र आरोपी हितेश मेहता तपासात सहकार्य करत नसल्याने आता त्याची लाय डिटेक्टर टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं हालचाली सुरू केल्या आहेत. 

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 122 कोटींचा अपहार झाला होता. याप्रकरणी लागोलाग तपासाची चक्रं हलवत पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक केली. कोर्टाने दोघांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. मात्र आरोपी हितेश मेहता कसा अपहार केला याची कोणतीही माहिती देत नसल्याने आता त्याची लाय डिटेक्टर टेस्ट केली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत गुन्हे शाखा हालचाली करत आहे. 

- आतापर्यंतचा तपास हितेश मेहताने विकासक धर्मेश पौनला 70 कोटी दिले 
- सोलर पॅनल व्यावसायिक उन्ननाथन अरुणाचलमला 40 कोटी दिले

- नंतर मेहताने माहितीत फेरफार करत पौनला 50 कोटी दिल्याचे सांगितले

- धर्मेशच्या म्हणण्यानुसार, मेहताने 12 ते 13 कोटी दिल्याचा दावा केला

- त्यामुळे मधल्या पैशांचे नेमके काय झाले? असा प्रश्न उपस्थित झाला

- मेहता काहीतरी माहिती लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे

- यासाठीच लाय डिटेक्टर चाचणी करण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा विचार करतीये

तर लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजे एखादी व्यक्ती खोटं बोलतोय का हे तपासणं आहे. या चाचणीत प्रश्नांची उत्तरं देताना व्यक्तीच्या शरीरातील बदल मोजले जातात. विशिष्ट प्रश्नांवर तीव्र प्रतिक्रिया दिली तर व्यक्ती निर्दोष किंवा दोषी असल्याचे ठरतं.

न्यू इंडिया को. ऑप. बँक घोटाळाप्रकरणात सध्या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात बँकेत 130 कोटींहून अधिकच्या रोकडची कॅश इन हँडमध्ये नोंद होती. त्यापैकी 122 कोटीं रुपयांचा अपहार  मेहताने साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती आहे. एकाच वेळी कोट्यवधी पैसे बाहेर कसे गेले. बँकेची कॅश लिमीट किती असते? अपहार सुरू असताना बँक आर्थिक व्यवहार कसा करायची, अशा अनेक प्रश्नांचा आर्थिक गुन्हे शाखा शोध घेत आहे. 

हितेश मेहताने न्यु इंडिया को. ऑप. बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव इथल्या शाखेत 122 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. करोना काळापासून म्हणजेच 2020 ते 2025 पर्यंत त्याने ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारला. हितेशने बँकेतील ठेवीदारांचे पैसे व्याजाने देण्यास सुरूवात केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. आता आरोपी हितेश मेहताच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी आर्थिक गुन्हे शाखा कोर्टात मागणी करण्याची शक्यता आहे. आता मेहताची लाय डिटेक्टर टेस्ट झाली तर आणखी काय काय माहिती समोर येते हे पाहावं लागेल.