Sanjay Raut On Ajit Pawar Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवार यांची स्थिती बरी," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला आहे. "अजित पवार यांनी त्यांच्या मर्यादा ओळखल्या आहेत व फडणवीस यांच्याशी त्यांचे नाते अधिक मजबूत आहे. सध्या अजित पवारांना काहीच व्हायचे नाही. त्यामुळे त्यांना अमित शहांच्या यादीतले जंटलमेन व्हायचे आहे," असा शब्दिक चिमटाही राऊतांनी 'रोखठोक'च्या लेखातून काढला आहे.
"भाजपबरोबर गेल्याने अजित पवार यांनी `ईडी'ची कारवाई टाळली. एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा `बोनस' म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळाले. या व्यवहारात अजित पवार खूश आहेत. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही व मुख्यमंत्री होण्यापेक्षा सुरक्षित बाहेर राहिलेले बरे हे धोरण पवारांनी स्वीकारले. पुन्हा धनंजय मुंडे यांचाही बचाव होत आहे, पण शिंदे यांचे तसे नाही. ठाकरे मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच होते व फडणवीस मंत्रिमंडळात असतानाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनायचे आहे. हा धोका फडणवीस यांनी ओळखला आहे," असं राऊतांचं म्हणणं आहे.
"शिंदे यांच्या सोबत असलेले किमान 21 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतात व फडणवीस यांच्या सूचनेनुसारच ते सुरतला गेले हे सत्य शिंदेही जाणतात. त्यामुळे शिंदे गट आजही एकसंध नाही. शिंदे हे स्वत:च डळमळीत झाल्याचे स्पष्ट जाणवते व समोर येऊन लढण्याचे बळ त्यांच्यात अजिबात नाही. शिंदे यांना सध्या अमित शहांचे पाठबळ आहे. ते वरवरचे व कामापुरते आहे. ते नसेल तेव्हा शिंदे यांचे नेतृत्व संपलेले असेल. अमित शहांचा रस शिंदे यांच्यात नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्यात व मुंबईवर पूर्णपणे ताबा मिळविण्यात आहे. शिंदे यांची मदत त्यांना त्यासाठी हवी. शहांचे काम झाले की, शिंदेंचे काम तमाम होईल हे नक्की," अशी शक्यता राऊतांनी व्यक्त केली आहे.
"शिंदे यांच्या पक्षाकडे (चोरलेल्या) कोणतेही धोरण नाही. पैशांच्या व उरल्यासुरल्या सत्तेच्या बळावर त्यांचे फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे. पुन्हा ते शिवसेनाच फोडतात. काँग्रेस-राष्ट्रवादीत ते घुसत नाहीत. कारण मालक अमित शहांनी त्यांना तेच काम दिले आहे. मात्र ते करत असताना त्यांच्या पायाखालची सतरंजी भाजपचे लोकच ओढत आहेत. आज सतरंजी ओढत आहेत. उद्या पायच कापतील. शिंदे व अजित पवार यांच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक त्या त्या खात्यात मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून बसणार व मंत्र्यांना मुबलक पैसे खाणे त्यामुळे बंद होईल. शिंदे त्यावर काय करणार?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> 'शिंदेंना संशय आहे की दिल्लीच्या एजन्सी त्यांच्या...'; फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा खबळजनक दावा
"रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद आहेत व गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले. त्यामुळे खाण उद्योग भयमुक्त झाला. शिंदे यांनी ठाणे व मुंबईचे पालकमंत्रीपद एकाच वेळी स्वत:कडे ठेवले. त्यात आर्थिक हितसंबंध जास्त आहेत. ठाण्यातला शिंद्यांचा एकछत्री कारभार यापुढे चालणार नाही. कारण भाजपने ठाणे जिल्ह्यातील गणेश नाईक यांना मंत्री व पालघरचे पालकमंत्री करून शिंदे यांची ठाण्यातली मक्तेदारी मोडली. शिंदे यांना हे आव्हान ठरेल. गणेश नाईक हे शिवसेना-भाजपच्या पहिल्या मंत्रिमंडळात होते तेव्हा शिंदे हे ठाण्यात नगरसेवक होते. त्यामुळे गणेश नाईक हे शिंदे यांना जुमानणार नाहीत. ते ठाण्यातच जनता दरबार भरवतील व शिंदे यांच्या डोक्याला मुंग्या आणतील. महाराष्ट्रात हा असा उघड संघर्ष सुरू आहे व तो संपेल असे वाटत नाही. बहुमत असूनही सरकार व राज्य अस्थिर आहे. तलवार चालवणारे त्याच तलवारीच्या घावाने संपतात. शिंदे यांच्यावर तलवारीचे घाव सुरू झाले आहेत. महाराष्ट्र मात्र निराश, निर्नायकी अवस्थेला पोहोचला आहे," असं राऊतांनी लेखाच्या शेवटाकडे म्हटलं आहे.
नक्की वाचा >> राऊतांचा धक्कादायक दावा! म्हणाले, 'शिंदे सेनेत 2 गट झालेत, एकाला स्वगृही जायचंय तर दुसरा गट थेट...'
"या साठमारीत महाराष्ट्र मेला काय, जगला काय, अमित शहांना त्याचे काय? इतिहास एकनाथ शिंदे व अजित पवार यांना माफ करणार नाही हे नक्की," असं राऊतांनी लेखाच्या शेवटी म्हटलंय.