भाजप-शिवसेना युती पक्की, 'झी २४ तास'च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

'झी २४ तास' वृत्तवाहिनीने या संदर्भातील माहिती पहिल्यादा ब्रेक केली होती.

Updated: Feb 18, 2019, 01:35 PM IST
भाजप-शिवसेना युती पक्की, 'झी २४ तास'च्या वृत्तावर शिक्कामोर्तब title=

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये युती होणार की नाही, हा प्रश्न राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला होता. पण अखेर भाजपने काहीशी नमती भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाल्यावर या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार हे निश्चित झाले आहे. 'झी २४ तास' वृत्तवाहिनीने या संदर्भातील माहिती पहिल्यादा ब्रेक केली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सोमवारी संध्याकाळी पाच वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर दोन्ही नेते पत्रकार परिषदही घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. याच पत्रकार परिषदेत युतीची औपचारिक घोषणा होईल. अर्थात जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

गेल्या गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळीच दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही सोमवारी पत्रकारांशी बोलताना युतीच्या दिशेने पाऊल पडले असल्याचे सूचक वक्तव्य केले. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी अमित शहा येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. अर्थात, यावेळी त्यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असेही वक्तव्य केले. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, हा बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वी सर्व समविचारी पक्षांशी युतीची औपचारिक बोलणी करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. त्यामुळेच भाजपने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी विविध सभांमधून स्वबळावर निवडणुका लढविण्याचे म्हटले होते. आता युती झाल्यास शिवसेना कार्यकर्त्यांना काय सांगणार, हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे.