Sadavarte Slams Suresh Dhas: बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये न्याय मिळावा म्हणून पाठ पुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी निशाणा साधला आहे. शनिवारी धाराशिवमधील मोर्चामधील जाहीर भाषणामध्ये धस यांनी, 'तुमच्यात दम आहे का? आमच्यात दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय, दोन्हींना तीन लेकरे आहेत,' असं म्हटलं होतं. यावरुन सदावर्तेंनी बहुपत्नित्वाच्या मुद्द्यावरुन धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुरेश धस यांचा एकेरी उल्लेख करताना, "सुरेश धसला कशाप्रकारे दोन पत्नी असल्याचा बढेजाव किंवा प्रचार करण्याची मुभा 46 च्या कायद्यान्वये नाहीये कारण लोकप्रतिनिधींसंदर्भात काही प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत. लोकसेवत असलेल्या लोकांसंदर्भात अगदी जिल्हा परिषदेपासून वेगवेगळ्या स्तरावरील लोकांना हे नियम, कायदे लागू आहेत. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने बडेजाव केला ते कोणत्याही प्रकारे शील आचारसंहितेला एक वचनी, एक पत्नी प्रभू श्री रामचंद्राच्या विचारांना खीळ घातल्यासारखं आहे," असं सदावर्ते म्हणाले आहेत.
धनंजय मुंडेंनाही पाच अपत्य आहेत. त्यांच्याविरोधातही तुम्ही कारवाईची मागणी करणार का? या प्रश्नावरही सदावर्तेंनी प्रतिक्रिया नोंदवली. "आपण सन्माननीय मंत्री श्री धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीत म्हणलात तर भारत निवडणूक आयोग, म्हणजे लोकसभा आणि विधानसभा लढवणाऱ्यांसाठी दोनपेक्षा जास्त अपत्यांच्या बाबतीत कोणताही प्रतिबंध घातलेला नाही. त्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं असेल (पाच अपत्य), मला माहिती नाही पण तुम्ही सांगताय म्हणून जर धनंजय मुंडेंनी तसं लिहिलं असेल तर ते सत्यच सांगत असतील ना. अपत्याच्या मुद्द्यावरुन अपात्र ठरण्याची शक्यता आता तरी दिसत नाही," असं सदावर्तेंनी म्हटलं आहे.
नक्की पाहा हे फोटो >> 40+ एकर जमीन, 8 घरं, 5 लाखांची गुरं अन् एकूण संपत्ती.. सुरेश धस किती श्रीमंत आहेत पाहिलं का?
"1946 चा कायदा हा बायकांच्या बाबतीत आहे. एक पत्नी असल्यासंदर्भात आहे. तो कायदा अंमलात आणा, लागू करा असं माझं म्हणणं आहे. पत्नीसंदर्भात 1946 चा कायदा लागू होतो. 1946 चा कायदा हा अनेक पत्नी कसा असं दर्शवणारा असल्याचा प्रचार धस करत आहेत. मात्र ते लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधीने कसं वर्तन करावं, त्याची शील आचारसंहित काय असावी हे प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामातेंच्या काळापासून विश्वासिक नात्यांपासूनच दर्शवली गेली आहे. म्हणूनच एक वचनी, एक पत्नी आहे. मी कायद्यावर बोट ठेऊनच सांगत आहे. अपत्यांबाबतीत असून कोणताही कायदा केलेला नाही," असं सदावर्तेंनी आपली बाजू मांडताना म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Santosh Deshmukh Murder: मस्साजोगमध्ये टेन्शन वाढलं! थेट मोबाईल टॉवरवर...; 'या' 5 मागण्या केंद्रस्थानी
स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासकिय अधिकारी यांना दोन बायकांबरोबर एकाच वेळी लग्न करण्याचा अधिकार नाही. यावर प्रतिबंध घालणं गरजेचं असून सदर प्रकरणी आपण मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी करणार असून धस यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता सदावर्तेंमुळे सुरेश धस अडचणीत येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.