Ajit Pawar on Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांनी आता त्यांना नैतिकतेचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. यापूर्वी नैतिकतेच्या मुद्यावर अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासह मंत्रिपदाचेही राजीनामे दिले आहेत. त्यामुळं धनंजय मुंडेंनीही नैतिकता पाळावी असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंचा राजीनामाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे.
अजितदादांची धनंजय मुंडेंना नैतिकतेची शिकवण
नैतिकतेतून राजीनामा देण्याची अप्रत्यक्ष सूचना
धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव
बीड जिल्ह्यातली वाढती राजकीय गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि संतोष देशमुख प्रकरणात समर्थकांचा सहभाग या मुद्यांवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सरकारमध्येच टोलवाटोलवी सुरु झाली होती. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजितदादा घेतील असं सांगितलं. मग अजितदादांनी राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं सांगितलं. स्वतः धनंजय मुंडेंनी अजितदादा जेव्हा सांगतील तेव्हा राजीनामा देण्यास तयार असल्याचं सांगितलं. पण धनंजय मुंडेंनी ना राजीनामा दिला, ना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला. आता अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करुन धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षरित्या राजीनामा द्यायला सांगितलं आहे.
नैतिकतेच्या मुद्याला हात घालताना त्यांनी यापूर्वी अनेक मंत्र्यांनी वेगवेगळे आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
-राम गोपाल वर्माला ताज हॉटेलमध्ये नेल्याप्रकरणी विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला
-26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी झालेल्या वक्तव्यातून आर आर पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला
-आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला
- पूजा चव्हाणच्या आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता
अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यातील आरोपांप्रकरणी राजीनामा दिला होता याची आठवण करुन दिली.
धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्यापेक्षा तो कुणी घ्यावा असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लगावला आहे. ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तो मंत्रीच राजीनाम्याचा निर्णय कसा घेणार असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राजीनाम्याचा चेंडू पुन्हा अजितदादांच्या कोर्टात टाकून भाजपला वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा महायुती सरकारनं अक्षरक्ष फुटबॉल केला आहे. आता अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केलाच आहे तर आता तरी धनंजय मुंडे राजीनाम्याचा विचार करतील का असा प्रश्न विचारला जात आहे.